रिलायन्स जिओच्या टेलिकॉम क्षेत्रातील आगमनाने इतर टेलिकॉम कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु झाली असून या स्पर्धेत एअरटेल कंपनीही मोठ्या उत्साहाने सहभागी झाली असल्याचे म्हणता येईल. एअरटेलने नुकताच आपल्या ग्राहकांसाठी इन्फीनिटी पोस्टपेड प्लान जाहीर केला आहे. ग्राहकांना या प्लानमध्ये ५० जीबी डेटा मोफत मिळणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांना या प्लानमध्ये मोफत अनलिमिटेड कॉलिंगही मिळणार आहे. एअरटेलने ही ऑफर ग्राहकांना जास्तीत जास्त इंटरनेट सुविधा मिळावी यासाठी लाँच केली आहे.
ग्राहकांना आकर्षित कऱण्यासाठी एअरटेलचा फंडा
जुन्या आणि नवीन दोन्ही ग्राहकांसाठी हा प्लान उपलब्ध असेल असे एअरटेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या प्लानची किंमत ९९९ रुपये ऐवढी असेल, असे ‘गॅजेट ३६०’या मोबाईल विषयक संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. त्याचबरोबर ही मोफत सुविधा ग्राहकांना सहा महिन्यांसाठी देण्यात येणार आहे. केवळ पोस्टपेड ही सुविधा ग्राहकांसाठी असेल. दररोज किती इंटरनेट वापरायचे यावर या प्लानमध्ये बंधन नसेल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.