पोलिसदलातील असली हिरो


पोलिसदलासंदर्भात बोलायचे म्हटले तर अनेकजण अनेक मते व्यक्त करतील. पोलिस आणि भ्रष्टाचार, पोलिस आणि राजकारणी, पोलिस आणि अंडरवर्ल्ड अशी अनेक समीकरणे या क्षेत्राबरोबर जुळविली जातात. निरपराध्याला त्रास आणि गुंडांना पाहुणचार देणारे ते पोलिस असेही म्हटले जाते. वास्तविक कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा असलेले हे दल. बहुतेक सर्वसामान्यांच्या मनात पोलिसांबद्दल दहशत असते. मात्र या दलातही कांही अधिकारी असे आहेत, ज्यांच्याविषयी कुणाचीही छाती अभिमानाने भरून येईल. हिंदी चित्रपटातून दबंग, सिंघम सारख्या भूमिका साकारून अभिनेते लोकप्रिय होतात व पोलिसांतील धडाडीच्या अधिकार्‍यांनाही दबंग, सिंघम नांवे दिली जातात. प्रत्यक्षातले असे असली हिरो सर्वच बाबतीत आदर्श असतात.


ही यादी तशी बरीच मोठी आहे पण त्यात अग्रणी नाव येते ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांचे. १९६८ सालचे केरळ केडर चे सर्वात यशस्वी अधिकारी अशी त्यांची ओळख. गुप्तहेर म्हणून त्यांची कारकीर्द खूपच तेजस्वी आहे. कामगिरी पार पाडण्यात त्यांनी अनेक रेकार्ड नोंदविली आहेतच पण सर्वसाधारणपणे मेडल मिळण्यासाठी १७ वर्षांची सेवा बजावावी लागते तेथे दोभाल यांना ६ वर्षांच्या सेवेतच मेडल मिळाले आहे. कंधार विमान अपहरण केसमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. १९८८ साली सैन्यातील जवानांना अदम्य साहसाबद्दल दिले जाणारे कीर्तीचक्र मिळविणारे दोभाल हे पहिलचे पोलिस अधिकारी आहेत. कामाबरोबरच फिटनेसबाबत अत्यंत जागरूक असलेले दोभाल आज वयाच्या ७२ व्या वर्षातही देशासाठी महत्त्वाचे योगदान देत आहेत.


हिमांशु रॉय – आयपीएल स्पॉट फिक्सिंग,पत्रकार जे डे मर्डर केस सारख्या महत्त्वाच्या केसेसचा तपास करणारे हिमांशू रॉय हे महाराष्ट्र केडरचे आयपीएस. जिममध्ये कठोर मेहनत करणार्‍या रॉय यांची बॉडी व मसल्स भल्याभल्या बॉडी बिल्डरच्या तोडीचे आहेत. सीए नंतर आयपीएस कडे वळलेले हिमांशु रॉय सध्या एडीजी पदावर कार्यरत आहेत.


सी सैलेंद्र बाबू- तमीळनाडू केडरचे सैलेंद्र बाबू एडीजी पदावर कार्यरत आहेत. त्याचा फिटनेस पाहून त्यांच्या वयाचा अंदाज बांधणे कठीण. ५५ वर्षांचे बाबू लेखक, स्पीकर व अॅथलिटही आहेत. एडीजी कोस्टल सिक्युरिटी पदावर असताना त्यांनी चेन्नई कन्याकुमारी या ८०० किमीच्या सायकल रॅलीचे नेतृत्त्व केले होते.


नवनीत सिकेरा- उत्तर प्रदेशात अँटी रोमिओ स्क्वॉड स्थापून समाजातील या उपद्रवी रोमिओेंना कसे निपटायचे याचे प्रशिक्षण देणारे नवनीन सिकरा सोशल मिडीयावरही चांगलेच अॅक्टीव्ह असतात. फिटनेसबाबत ही ते चांगलेच जागरूक आहेत. आयआयटी दिल्लीचे पदवीधर असलेले सिकरा यांच्या नावावर ५० एनकाऊंटर आहेत. यूपीचे दया नायक अशी त्यांची ओळख आहे.


विश्वास नांगरे पाटील- महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशभरातील युवकांचे प्रेरणास्थान असलेले विश्वास नांगरे पाटील मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यात महत्त्वाची कामगिरी बजावून खर्‍या अर्थाने प्रसिद्धीस आले. कोल्हापूर जवळच्या खेड्यातून आलेले पाटील १९९७ च्या बॅचचे आयपीएस.२०१५ साली त्यांना प्रेसिडेंट अॅवार्ड मिळाले आहे. फिटनेसबाबत नांगरे पाटील काटेखोर आहेत. ते मॅराथॉन रनर आहेतच पण आळंदी पंढरपूर सायकल वारीमुळेही ते तरूणांत लोकप्रिय आहेत. तरूणांना मार्गदर्शन करणारी पुस्तके, लेख व भाषणे ते देत असतात. अतिशय निर्भिड अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.


शिवदीप लांडे- रियल लाईफमधील सिंघम अशी यांची ओळख. भल्याभल्या क्रिमिनलला घाम फोडणारे लांडे यांची बिहार येथील कारकीर्द खूपच गाजली. बिहारच्या मुली महिलांमध्ये ते अतिशय लोकप्रिय असून त्यांना या महिला समुदायाने रक्षणकर्त्या भावाचा दर्जा दिला आहे. महाराष्ट्र केडरचे लांडे सध्या मुंबईत डीसीपी पदावर कार्यरत आहेत. अमलीपदार्थ विरोधी दलाचे ते प्रमुख आहेत.


सचिन अतुलकर हे २००७ सालचे मध्यप्रदेश केडरचे आयपीएस. पहिल्याच प्रयत्नात अवघ्या २२ व्या वर्षीच आयपीएस झालेले अतुलकर कामाइतकचे नवीन सोशल सेन्सेशन म्हणून प्रसिद्धीस आले आहेत. लहानपणापासून स्पेार्ट आणि योगाचे वेड असलेल्या अुतलकर यांनी या दोन्ही क्षेत्रात अनेक मेडल्स मिळविली आहेत.कितीही काम असले तरी फिट राहण्यासाठी वेळ काढणरे अतुलकर फिटनेस बॉडी बिल्डींग बाबत जागरूक असून गुगल वेबसाईटवर त्यांच्यावर खूप लिहिले गेले आहे.दीर्घ व्यायाम ही त्यांची ओळख. उज्जैनचे एसपी नंतर त्यांची नवी पोस्टींग कुठे झाली याची माहिती मिळू शकलेली नाही.

Leave a Comment