प्रेमाच्या बेडयांमुळे ठार झाले हे अतिरेकी


काश्मीरमध्ये दररोज कुठे ना कुठे अतिरेकी दहशतवाद्यांकडून हल्ले झाल्याच्या बातम्या येतात तसेच सुरक्षा रक्षकांनी, लष्कराने दहशतवाद्यांचे डाव उधळून त्यांना ठार केल्याच्या बातम्याही येत असतात. यातील बहुतेकांचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे दिसून येतेच. चकमकीत ठार झालेल्या या अतिरेक्यांच्या केसेस समजून घेतल्या तर असे दिसते की यातील बहुतेक सर्वजण त्यांच्या प्रेमपात्रांना अथवा बायकोला भेटायला आल्यानंतर मारले गेले आहेत. याचाच अर्थ असा की प्रेमाच्या बेड्याच या अतिरेक्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या आहेत.


लष्कराकडून नुकताच मारला गेलेला जैश ए महंमद या अतिरेकी संघटनेचा अबु खालिद गर्लफ्रेंडने सुरक्षा सैनिकांना दिलेल्या माहितीमुळेच मारला गेला असल्याचे सांगितले जात आहे. या अबुचे अनेक काश्मीरी मुलींबरोबर संबंध होते पण त्यातील एकीनेच आपले त्याच्याबरोबरचे नाते संकटात येईल अशी भीती वाटल्याने तो येणार असल्याची खबर सुरक्षा सैनिकांना दिली होती.


लष्करे तैयब्बाशी सबंधित जुनैद अहमद कुलगा हाही असाच त्याच्या प्रेमपात्राला भेटायला येत असे. पाळतीवर असलेल्या सुरक्षा सैनिकांनी त्याच्यासंदर्भात ही माहिती मिळवली व तो येणार असल्याची सूचना मिळताच त्याला पकडण्यासाठीचा सापळा रचला गेला. प्रथम त्याला शरण येण्यासाठी आवाहन केले गेले मात्र त्याने पोलिसांवर उलट गोळीबार करताच त्याला ठार केले गेले.


लष्करे तैयबाचा काश्मीरमधील कमांडर अबु दुजाना रात्री उशीरा पत्नीला भेटण्यासाठी आला होता तेव्हाच मारला गेला.


पोस्टर बॉय म्हणून प्रसिद्ध असलेला बुरहान वाणी हिज्बुल या अतिरेकी संघटनेचा कमांडर. दहशतवाद्यांचा आदर्श. दिसायला अतिशय देखण्या असलेल्या बुरहानच्या अनेक मैत्रिणी होत्या व त्यातील एकीने त्याच्यासंदर्भातली माहिती सुरक्षा सैनिकांना दिली व अनंतनाग येथे तो मारला गेला.


बशीर वाणी एप्रिल २०१७ मध्ये अनंतनाग येथेच मारला गेला. तोही गर्लफ्रेंडला भेटायलाच आलेला होता.