Skip links

कामगार आणि तणाव


सध्या आपली जीवनशैलीच अशी झाली आहे की, तिचा शेवट तणावात होत आहे. त्यातूनच मग रक्तदाब, हृदयविकार यांचा उगम होतो म्हणून तणाव आटोक्यात आला की, हे सगळे विकार आपोआपच नियंत्रणात रहायला लागतात. मात्र तणाव नियंत्रणात ठेवायचा असेल तर त्याची कारणे जाणून घेतली पाहिजेत. यास्तव देशातल्या चार मोठ्या शहरांतल्या कामगारांचा तणाव आणि त्याची कारणे यांचा मागोवा घेण्यात आला. या दिशेने करण्यात आलेल्या पाहणीत असे आढळले की, ३१ टक्के कामगार तणाव सोबत घेऊनच जगत असतात. हा निष्कर्ष काढण्यासाठी एक लाखापेक्षाही अधिक कामगारांची केवळ पाहणीच नाही तर चौकशीही करण्यात आली आणि चर्चेतून तणावाची कारणे शोधण्यात आली.

हैदराबाद,चेन्नई आणि कोलकत्ता या शहरातल्या कामगारांत त्या मानाने कमी तणाव आहे. दिल्ली, मुंबई आणि बंगलोरमध्ये त्याचे प्रमाण जास्त आहे. हे तणावग्रस्त लोक कोणाशीही आपल्या तणावाबाबत बोलत नाहीत. त्यामुळे त्यांच्या तणावाचा निचरा होत नाही. तसा तो होणे मात्र आवश्यक आहे. त्याच दृष्टीने काही मानसशास्त्रज्ञांनी या लोकांशी तणावामागच्या कारणाबाबत चर्चा केली. तेव्हा काम पूर्ण करण्याची मुदत, कामाचे वाढवलेले उद्दिष्ट, त्यांची पूर्तता करण्यासाठी येणारा दबाव ही काही कारणे असल्याचे लक्षात आले. त्यातल्या त्यात जास्त वेळ काम करावे लागणे आणि कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी करावा लागणारा प्रवास हीही तणावाची कारणे असल्याचे आढळले. विशेषत: कामावर वेळेला हजर राहणे हे एक आव्हान वाटते असे अनेकांनी नमूद केले.

काही कामगारांनी कामाच्या ठिकाणी होणारे राजकारण हेही तणावाचे कारण असल्याचे सांगितले. कारण अशा राजकारणातूनच कामाची शाश्‍वती रहात नाही. राजकारणात कमी पडलो तर नोकरी जाईल अशी सतत भीती वाटते. या बाबत व्यवस्थापन फार मदत आणि सहकार्य करीत नाही. मार्गदर्शन करून संरक्षण देणे तर दूरच. कामाचे तास कमी असतात पण कामावर जाण्यायेण्याचा वेळ फार असतो आणि ते तास मोजल्यास जीवन जगण्यास फार कमी वेळ मिळतोे. घरात किेंवा कुटुंबात कमी वेळ मिळतो. त्यामुळे कामाच्या ठिकाणी येणारा तणाव कमी होत नाही. शहरे मोठी झाली आणि त्यामुळे कामाला जाण्यासाठी आणि येण्यासाठी तीन तीन तास लागतात.

Web Title: Workers and stress