फटाका बंदी निरर्थक -‘सामना’तून टीका


मुंबई – ‘बंदी’चे आदेश देणं सोपं आहे, अंमलबजावणीचे मात्र बारा वाजतात. हा लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. न्यायालये आणि सरकारे पोटापाण्याचे प्रश्न सोडवीत नाहीत तोपर्यंत अशा बंदी निरर्थक आहेत,’अशी भूमिका फटाक्यांवरील बंदीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या‘सामना’ने आपल्या अग्रलेखातून मांडली आहे.

‘सामना’च्या अग्रलेखातील म्हटले आहे की दिल्लीत फटाके बंदीवरून गोंधळ सुरू असताना इकडे मुंबईसह महाराष्ट्रातही फटाके बंदीचा लवंगी फटाका फुटला आहे. या निर्णयामुळे प्रदूषणाची पातळी किती खाली येईल ते सांगता येत नाही, पण हिंदूंच्या सण-उत्सवातील धडाकाच निघून जाईल. आनंदावर विरजण पडेल.

दिवाळीसाठी ज्यांनी कर्ज घेऊन माल भरला आहे आणि या ‘बंदी’मुळे त्यांना आता फटाके विकता येणार नाहीत. त्यांची ही जी काही कोंडी झाली आहे त्यावर तोडगा काय? ज्यांचा रोजगार व कामधंदा फटाका बंदीमुळे कायमचा बुडणार आहे त्यांच्या पोटापाण्याची न्यायालय काय व्यवस्था करणार आहे? की त्यांनीही उपासमारीस वैतागून शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या कराव्यात असे न्यायालयाचे आदेश आहेत?

मुंबईसह राज्यभरातील शहरांमध्ये निवासी इमारती व निवासी भागातील फटाके विक्री दुकानांचे परवाने रद्द करा किंवा अशा ठिकाणी अपघात होणार नाहीत याची खबरदारी घ्या, असे आदेश गेल्या ऑक्टोबरमध्येच मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पोलिसांनी आता कारवाई सुरू केली. त्यामुळे लहान विक्रेते व व्यापारी वर्गाचे नुकसान होत आहे.

बंदींचे शेवटी काय होते, हा संशोधनाचाच विषय आहे. मोदी सरकारने ‘नोटाबंदी’चा फटाका वाजवून जे आर्थिक मंदीचे प्रदूषण केले त्याचे परिणाम जनता भोगत आहे.