कुराणबाबत सलमान रश्‍दी यांचे वादग्रस्त वक्तव्य


मुंबई – इस्लामचा पवित्र धर्मग्रंथ कुराणवर केलेल्या वक्तव्यामुळे वादग्रस्त पुस्तक ‘द सॅटनिक व्हर्सेस’चे लेखक सलमान रश्दी अडचणीत येण्याची शक्यता आहे. सलमान रश्दी यांनी कुराण वाचताना सुख किंवा आनंद होत असल्याचा अनुभव येत नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी हे वक्तव्य ब्रिटनमधील चेलटेनहम लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये बोलताना केले आहे. मी कुराण वाचू शकत नाही. कारण मला ते वाचताना आनंद मिळत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

इस्लामिक कट्टरपंथींच्या निशाण्यावर ‘द सॅटनिक व्हर्सेस’ पुस्तकानंतर राहिलेले सलमान रुश्दी पुन्हा एकदा यानिमित्ताने चर्चेत आले असून, त्यांच्यावर पुन्हा एकदा टिकेची झोड उठण्याची शक्यता आहे. मुस्लिम समाजातील अनेकांनी ‘द सॅटनिक व्हर्सेस’ पुस्तकानंतर संताप व्यक्त केला होता. त्याचबरोबर त्यांच्या हत्येसाठी फतवाही जारी झाला होता. यामध्ये इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्लाह खुमैनी यांनी सलमान रश्दी यांची हत्या करणा-याला लाखो डॉलर्स बक्षिस म्हणून देण्याची घोषणा केली होती.