जय शहा प्रकरणात अमित शहांच्या मदतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ


(छायाचित्र सौजन्य-हिंदुस्तान टाईम्स)
नवी दिल्ली – सध्या देशभरात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांच्या कंपनीला गेल्या वर्षात आलेल्या ‘अच्छे दिना’चा मुद्दा चांगलाच चर्चेत असून विरोधकांनी पार्टी विथ डिफरन्स म्हणवून घेणाऱ्या भाजपच्या अध्यक्षांवरच थेट हल्ला चढवल्यामुळे सत्ताधारी भाजप चांगलच अडचणीत सापडला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच पार्श्वभूमीवर अमित शहांच्या मदतीला धावून आला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसाबळे यांनी भोपाळमध्ये संघाच्या बैठकीत कोणावरही आरोप करताना त्यासंदर्भातील पुरावे दिले पाहिजेत. एखाद्या व्यक्तीविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप असतील, तर त्याची सखोल चौकशी व्हायला हवी. पण अशी चौकशी करण्यापूर्वी संबंधित आरोप कशाच्या आधारावर केले जात आहेत, त्याचे पुरावेही आरोप करणाऱ्याने दिले पाहिजेत, असे म्हटले आहे.

होसाबळे यांना यावेळी पत्रकारांनी या प्रकरणात जय शहा यांच्याविरुद्ध खटला दाखल केला जायला हवा का, असा प्रश्न विचारल्यावर त्याला उत्तर देताना होसाबळे म्हणाले, ज्यांनी आरोप केले आहेत. त्यांनीच पुरावे देऊन ते खरे असल्याचे दाखवून दिले पाहिजे.