या समाजात वरदक्षिणा म्हणून देतात २५ विषारी साप


आजकाल लग्नात वरदक्षिणा किवा हुंडा देण्याघेण्यास कायद्याने बंदी आहे. तरीही अन्य कांही गोंडस नावाखाली ही प्रथा आजही सुरूच आहे. भारतात विवाहाच्या तसेच हुंडा देण्याच्या विविध पद्धती आहेत. मात्र गारूडी काम करणार्‍या समाजासारखा हुंडा कुठेच दिला घेतला जात नसेल. या समाजात शेकडो वर्षे लग्नात वराला २५ विषारी साप हुंडा म्हणून देण्याची प्रथा आहे व आजही ती पाळली जाते.

लग्न ठरताच मुलीचा पिता साप पकडायला सुरवात करतो.लग्नाच्या दिवशीपर्यंत २५ साप पकडले गेले नाहीत तर लग्न मोडले जाते. महासमुंद रस्त्यावर जोगी डीपा येथे या समाजाची २०० लोकांची वस्ती आहे. तेथील गारूड्यांनी दिलेल्या माहितीनुसार लग्न ठरले की मुलाला ही विषारी जनावरे हाताळण्याचे शिक्षण घ्यावे लागते. येथे बालविवाह प्रथा आहे. वरात आली की वराला ही विषारी वरदक्षिणा दिली जाते. त्यानंतर या सापांचे खेळ करून त्याने उदरनिर्वाह चालवावा अशी अपेक्षा असते.

आजकाल साप पकडण्यावर सरकारची बंदी आहे तसेच सापांचे खेळ करण्यासही बंदी आहे त्यामुळे या समाजापुढे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. इतक्या मोठ्या संख्येने विषारी साप मिळत नाहीत. त्यातून एखाद्याला मुली जास्त असल्या तर त्याच्यापुढे सापांचा एवढा मोठा हुंडा कुठून आणायचा असा प्रश्न पडतो. मग कांही वेळा शगुन म्हणून पाच सांप दिले जातात व नंतर जमतील तसे साप पकडून दिले जातात.

Leave a Comment