सरकारी पोस्टरवर फुटिरतावादी महिला नेत्याच्या फोटोमुळे मुफ्ती यांची नाचक्की


श्रीनगर – जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मुफ्ती महबूबा यांची बेटी बचाव, बेटी पढाव अभियानाच्या पोस्टरवर झालेल्या एका चुकीमुळे नाचक्की झाली आहे. फुटीरतावादी नेत्या असिया अंद्राबी यांचे छायाचित्र जम्मू काश्मीर सरकारच्या अनंतनागमधील सरकारी कार्यक्रमाच्या पोस्टरवर असून दुख्तरान-ए-मिल्लत या संघटनेच्या अंद्राबी प्रमुख आहेत. त्याचबरोबर या पोस्टरवर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, नोबेल पुरस्कार विजेत्या मदर तेरेसा यांचीही छायाचित्रे छापण्यात आली आहेत. असिया अंद्राबी यांचे छायाचित्र अशा दिग्गज व्यक्तींसोबत लावण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.

पीडीपी आणि भाजप यांची सत्ता जम्मू काश्मीरमध्ये असल्यामुळेच भाजपने या संपूर्ण घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. बेटी बचाव, बेटी पढावचा संदेश जम्मू काश्मीर सरकारकडून लावण्यात आलेल्या पोस्टरवरुन देण्यात येत आहे. माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी, भारतरत्न लता मंगेशकर, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, टेनिसपटू सानिया मिर्झा, जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती, नोबेल पुरस्कारप्राप्त समाजसेविका मदर तेरेसा, अंतराळवीर कल्पना चावला यांची छायाचित्रेयासाठी पोस्टरवर लावण्यात आली आहेत. फुटीरतावादी नेत्या असिया अंद्राबी यांचे छायाचित्र या दिग्गज व्यक्तीमत्त्वांसोबत लावण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.