आशिष शेलार यांची ट्विटरवरुन शिवसेनेवर जहरी टीका


मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर पोटनिवडणुकीत मोठे दावे करणार्‍यांचे पोट फाडून भाजपचा विजय, अशा शब्दात निशाणा साधला आहे.

भाजपच्या उमेदवार जागृती पाटील यांनी भांडुपमधील वॉर्ड क्रमांक ११६ मधील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांचा दणदणीत पराभव केल्यानंतर ट्विटरवरुन शिवसेनेवर आशिष शेलार यांनी जहरी टीका केली.

मुंबईकरांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास! हा विजय विकासाचाच! सांगा आता वेडे कोण ठरले? असेही ट्वीट आशिष शेलार यांनी केल्यामुळे आता शिवसेना भाजपच्या या टीकेला काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, भाजपच्या जागृती पाटील यांना या निवडणुकीत तब्बल १११२९ मते मिळाली आहेत. तर शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांना केवळ ६३३७ मते मिळाली आहेत.