एफटीआयआयमध्ये स्वच्छ मनाने जाणार – अनुपम खेर


पुणे – फिल्म अँड टेलिव्हिजन संस्थेचे नव्याने अध्यक्ष झालेले ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ज्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेतलेला विद्यार्थी त्याच संस्थेचा अध्यक्ष बनतो, असे क्वचितच घडते. आजचा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

एफटीआयआयच्या अध्यक्षपदी खेर यांची बुधवारी नियुक्ती झाली. मावळते अध्यक्ष गजेंद्र चौहान यांची कारकिर्द वादग्रस्त ठरल्याने खेर यांच्या नियुक्तीचे महत्त्व वाढले आहे. खेर यांनी नियुक्तीनंतर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की मी स्वच्छ मनाने एफटीआयआयमध्ये जाणार आहे. जेवढे शक्य होईल तेवढे चांगले काम करणार आहे.

दरम्यान खेर यांचे गजेंद्र चौहान यांनी अभिनंदन केले असून खेर एफटीआयआयमध्ये चांगले काम करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तर केंद्र सरकारकडून खेर यांच्या नावाची अधिकृत घोषणा होताच सरकारच्या या निर्णयाचे एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी देखील स्वागत केले आहे.