Skip links

नवोदय विद्यालयांचे प्रवेश यंदापासून ऑनलाईन


मुंबई – देशभरातील सर्व 560 जवाहर नवोदय विद्यालयांचे इयत्ता सहावीच्या प्रवेश परीक्षांचे अर्ज या वर्षीपासून फक्त ऑनलाईन पध्दतीनेच भरले जाणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने जाहीर केला आहे. अर्ज फक्त कॉमन सर्व्हीस सेंटर (महा इ-सेवा केंद्र) द्वारेच भरले जाणार आहेत. तिथेच परीक्षाकेंद्र प्रवेश पत्रही दिले जाणार आहे.

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कल्पनेतून सन 1982 मध्ये संपूर्ण देशभरातील उत्तम बुध्द्यांक असलेल्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारतर्फे इयत्ता बारावीपर्यंत शिकविण्यासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक अशी 560 जवाहर नवोदय विद्यालये सुरू करण्यात आली. यातील पुणे जिल्ह्यासाठीचे नवोदय विद्यालय पिंपळे-जगताप (ता. शिरूर) येथे सुरू आहे.

गेल्या पाच वर्षात परिक्षार्थींची संख्या प्रतिवर्षी दहा टक्‍क्‍यांनी वाढत आहे. शाळा, पंचायत समिती, जिल्हा परिषद (शिक्षण विभाग) अशा स्तरांतून लेखी स्वरुपात परीक्षा अर्ज भरण्याच्या या पूर्वीच्या पध्दती आता नियंत्रणासाठी अवघड होऊ लागल्याने यावर्षी पासून फक्त ऑनलाईन पध्दतीनेच प्रवेश अर्ज स्विकारण्यास सुरूवात केली आहे. हे अर्ज भरण्यासाठीची परवानगी ही केंद्र व राज्य सरकारच्या ऑनलाईन सेवा देणा-या कॉमन सर्व्हीस सेंटर्सना (महा ई-सेवा केंद्र) यांना दिली असून विद्यार्थी, पालक व शाळांनी या सेंटर्समध्ये आपले अर्ज भरुन द्यावे लागणार आहेत. अर्ज भरण्याची मुदत 25 नोव्हेंबर पर्यंत आहे.

Web Title: Admission to Navodaya Vidyalaya Online from present