आरुषी-हेमराज हत्याप्रकरणी तलवार दाम्पत्याची निर्दोष मुक्तता


अलाहाबाद – अलाहाबाद उच्च न्यायालयाने नुपूर आणि राजेश तलवार यांची नोएडाच्या बहुचर्चित आरुषी-हेमराज हत्याप्रकरणी निर्दोष मुक्तता केली असून तलवार दाम्पत्याला या प्रकरणात दोषी ठरवून विशेष सीबीआय सत्र न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तलवार दाम्पत्याने या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

नोव्हेंबर २०१३ ला आरुषीचे वडील डॉ. राजेश तलवार आणि आई डॉ. नुपूर तलवार यांना गाझियाबादच्या विशेष सीबीआय सत्र न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्यांना त्यावर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांनी त्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

१४ वर्षांच्या आरूषीचा मृतदेह मे २००८ मध्ये नोएडातील जलवायू विहार परिसरातील घरात आढळून आला होता. तिचा गळा तीक्ष्ण शस्त्राने चिरण्यात आला होता. सुरूवातीला संशयाची सुई हेमराजकडे गेली होती. पण दोन दिवसानंतर घराच्या गच्चीवर त्याचाही मृतदेह आढळला होता.

उत्तर प्रदेश पोलिसांवर देशभरातील माध्यमांमध्ये चर्चिल्या गेलेल्या या प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले होते.