मग पुरुष गरोदर का होत नाहीत- मौलानांचा सवाल


प्रत्येकाला जर स्त्री-पुरुष समानता पाहिजे असेल, तर स्त्रिया आणि पुरुष प्रत्येकी साडे चार महिने गरोदर का राहत नाहीत, असा विचित्र सवाल मुंबईतील मौलानांनी केला आहे.

गुलझार आझमी असे या मौलानांचे नाव असून ते जमियत उलेमा या संघटनेचे सरचिटणीस आहेत. केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी काही दिवसांपूर्वी नवीन हज धोरण सादर केले होते. त्या अंतर्गत 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना पुरुष साथीदार नसतानाही हज यात्रा करण्याचे सूतोवाच केले होते. त्या धोरणास विरोध करताना आझमी यांनी वरील वक्तव्य केले.

“हा 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना हजला एकट्याने जाऊ देण्याचा निर्णय बेकायदा असून तो इस्लाममध्ये हस्तक्षेप आहे. महिला एकट्या हजवर जाऊ शकत नाहीत, असे कुराणात स्पष्ट म्हटले आहे,” असे आझमी म्हणाले.

लैंगिक समानतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ते म्हणाले, “समानतेबाबतच बोलायचे तर गर्भाशयात बाळ वाढविण्यातही समानता हवी. मग पुरुषाने साडे चार महिने आणि महिलेने साडे चार महिने बाळाला वाढवावे. तेव्हाच समानता आली, असे आपण म्हणू शकू. आधी जन्माच्या प्रक्रियेत समानता यायला हवी मगच समानतेच्या अन्य पैलूंवर इस्लाममध्ये अंमलबजावणी करता येईल.”