Skip links

मंदिराबाहेर भीक रशियन नागरिकाच्या मदतीसाठी धावून आल्या सुषमा स्वराज


नवी दिल्ली – एटीएमचा पीन लॉक झाल्यामुळे भारतात पर्यटनासाठी आलेल्या रशियन पर्यटकावर मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ त्याच्यावर आली. हा रशियन तरुण खर्चासाठी पैसे नसल्याने कांचीपुरम येथील श्री सुब्रमण्यम स्वामी मंदिराच्या बाहेर भीक मागत होता. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना ही गोष्ट ट्विटच्या माध्यमातून समजताच त्या या तरुणाच्या मदतीसाठी देवासारख्या धावून आल्या.

भारत भ्रमंतीसाठी २४ सप्टेंबरला इवेन्जलिन हा रशियन तरुण भारतात आला होता. पण त्याच्या एटीएमचा पीन भारतात आल्यानंतर लॉक झाला. त्याच्याजवळ खर्चासाठी पैसे नव्हते. त्याला एटीएमचा पीन लॉक झाल्याने पैसेही काढता येईना. या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी कांचीपुरम येथील श्री सुब्रमण्यम स्वामी मंदिराच्या बाहेर भीक मागायचे त्याने ठरवले. स्थानिकांना विदेशी पर्यटक मंदिराबाहेर भीक मागत असल्याचे पाहून धक्काच बसला. याची माहिती त्यांनी तातडीने पोलिसांना दिली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याच्याजवळ सर्व कागदपत्र होती पण आर्थिक अडचणींमुळे भीक मागत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

या तरूणाच्या अडचणीकडे अनेकांनी ट्विट करत स्वराज यांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या मदतीला अखेर स्वराज धावून आल्यात. रशिया हा आमचा जुना मित्र आहे. चेन्नईमधील अधिकारी तुला सर्वोतोपरी मदत करतील, असे ट्विट करत स्वराज यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे.

Web Title: Russian man found begging at Kanchipuram temple, cops and Sushma step in to help