अमेझॉनला तरुणाने घातला ५२ लाखांचा गंडा


(छायाचित्र सौजन्य-हिंदुस्तान टाईम्स)
आजकाल ऑनलाईन शॉपिंग करणे इतके सोयीचे झाले आहे, की किराणा मालापासून ते मोठ्या विद्युत उपकरणांपर्यंत सर्व काही ऑनलाईन मागवता येते. ऑनलाईन शॉपिंग मध्ये आपल्याला हवी ती वस्तू अगदी रास्त किमतीमध्ये घरबसल्या आपल्या हातात मिळते. ऑनलाईन वस्तू मागवताना एखादी वस्तू क्वचित खराब निघते. अश्यावेळी ती वस्तू बदलून घेता येते, किंवा ती वस्तू परत करून आपले पैसे ही परत मिळवता येतात. पण याच सोयीचा गैरफायदा घेत एका तरुणाने चक्क १६६ वेळा मोबाईल फोन्स च्या ऑर्डर वर ‘ रिफंड ‘ मागून कंपन्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

अमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीची ५२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा या तरुणावर आरोप आहे. हा तरुण या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट वरून महागडे मोबाईल फोन ऑर्डर करत असे. फोन त्याच्या पर्यंत पोहोचल्यानंतर हा तरुण, मोबाईल फोन चा बॉक्स आपल्याला रिकामाच मिळाला असल्याचा दावा करीत, कंपनीकडून रिफंड लाटीत असे. अश्या प्रकारे त्याने २२५ वेगवेगळे फोन ऑर्डर केले होते. पैकी १६६ फोन्सवर त्याने रिफंड मिळविला असल्याचे उघड झाले आहे. हा तरुण २१ वर्षे वयाचा असून नवी दिल्ली येथील राहणारा आहे. या पूर्वी तो निरनिराळ्या हॉटेल्समध्ये कामे करीत असून, सध्या बेरोजगार आहे.

जेव्हा शहराच्या एकाच भागामधून काही ठराविक व्यक्तींकडून वारंवार रिफंड साठी क्लेम येऊ लागले, तेव्हा या ई – कॉमर्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अधिक शोध घेतला असता, खरा प्रकार उघडकीला आला. त्यानंतर या कंपनीने पोलिसांकडे रीतसर तक्रार नोंदविल्यानंतर या तरुणाला अटक करण्यात आली. ह्या तरुणाने हे काम नक्की कसे पार पडले या बद्दल माहिती देताना पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की ह्या तरुणाने आपल्या ओळखीच्या एका टेलीकॉम स्टोरच्या मालकाकडून अनेक बनावट नावांनी १४१ सिम कार्ड्स खरेदी केली. ह्या सिम कार्ड्स वरील विविध नंबर वापरून त्याने ५० वेगवेगळ्या बनावट नावांनी ई – मेल आयडी तयार केले. हे ई- मेल आयडी वापरून त्याने संबंधित ई- कॉमर्स कंपनीच्या अॅपवरून अनेक महागडे फोन खरेदी केले. ह्या फोन्स ची डिलिव्हरी मिळाल्यानंतर फोन चा बॉक्स रिकामाच निघाला असे सांगून कंपनीकडून रिफंड मागितला.

हा तरुण फोन्स च्या डिलिव्हरी साठी खोटे पत्ते पुरवीत असे. डिलिव्हरी घेताना तो नेहमी रोख रक्कम देत असे, त्यामुळे त्याची खरी ओळख लपून रहात असे. फोन ची डिलिव्हरी घेतल्यानंतर बॉक्स रिकामा होता असे सांगून हा तरुण कंपनीकडून रिफंड घेत असे. असे केल्याने त्याचा दुहेरी फायदा होत असे, एक तर कंपनीकडून त्याला फोनच्या किमतीइतके गिफ्ट व्हाऊचर दिले जात असे, शिवाय नवा फोन, बॉक्स आणि पावतीशिवाय काळ्या बाजारात चांगल्या किमतीला बाहेर विकून चांगली कमाईसुद्धा करता येत असे. अखेर ई- कॉमर्स कंपनीला जेव्हा या बद्दल सुगावा लागला, तेव्हा त्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर या बिलंदर चोराला अटक करण्यात आली.