धोनीच्या सल्ल्यामुळे भारताचा झाला पराभव!


गुवाहटी : सध्याचा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली नेहमी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीशी मैदानावर सल्लामसलत करताना आपण पहिलेच आहे. पण धोनीकडूनही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात एक अशी चूक झाली, ज्याच्यामुळे सामन्याला कलाटणी मिळाली असती.

टीम इंडियाला डीआरएसचा वापर न करणे महागात पडले. भुवनेश्वर कुमारच्या पाचव्या षटकातील एका चेंडूवर हेनरिक्स फलंदाजी करत असताना चेंडू बॅटला हलकासा स्पर्श करुन धोनीच्या हातात गेला. यासाठी सर्व खेळाडूंनी अपील केले होते. पण हेनरिक्स बाद नसल्याचा निर्णय पंचांनी दिला.

विराटने यानंतर तातडीने धोनीचा सल्ला घेतला. पण डीआरएसची गरज नसल्याचे धोनीने सांगितले. काही वेळानंतर हेनरिक्स बाद होता हे टीव्ही रिप्लेमध्ये दाखवल्यानंतर स्पष्ट झाल्यामुळे टीम इंडियाने डीआरएसचा वापर केला असता तर हेनरिक्सला माघारी परतावे लागले असते.

हेनरिक्सने ऑस्ट्रेलियाच्या विजयात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने केवळ २ धावांवर मिळालेल्या जीवनदानाचा फायदा घेत नाबाद ६२ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने हेनरिक्सच्या या खेळीच्या जोरावरच विजय मिळवला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.