म्हैसूर सँडल सोपची शंभरी


आज बाजारात अनेक प्रकारचे, अनेक वासांचे, अनेक रूपांचे आणि अनेक दरांचे साबण आहेत. मात्र आपल्या देशातला पहिला साबण कुठला असे विचारले गेले तर त्याचे उत्तर देताना स्वातंत्र्यापूर्वीपासून देशात असलेले लक्स, लाईफबॉय, सिंथॉल अथवा हमाम अशा साबणांची नांवेच जिभेवर येतील. अर्थात हे उत्तर चुकीचे ठरेल कारण हे ब्रँड बाजारात आलेही नव्हते तेव्हापासूनच एक भारतीय साबण बाजारात होता व त्याचे नाते थेट राजपरिवाराशी होते. केवळ भारतातच नाही तर परदेशी राजघराण्यातूनही या साबणाला मागणी हेाती व हे नांव आहे म्हैसूर सँडल सोप.

शुद्ध चंदनी लाकडाच्या तेलापासून बनविलेला म्हैसूर सँडल सोप आजही लग्झरी ब्रँड आहे आणि हा साबण चक्क शंभरी ओलांडून गेला आहे. या कालावधीत त्यानेही अनेक चढउतार पाहिले आहेत आणि त्याच्या इतिहासासी म्हैसूरच्या शाही परिवाराचा इतिहासही जोडला गेला आहे.कारण याच परिवाराच्या प्रयत्नातून हा साबण जन्मला, वाढला व आजही त्याचा शुद्ध सुवास देशभरातील घराघरातून दरवळतो आहे. मे १९१६ साली प्रथम हा साबण तयार केला गेला.


तत्कालीन राजा कृष्णा वडीयार चौथे व त्यांचे दिवाण मोक्षगुंडम विश्वेसरैय्या यांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात चंदनाची निर्यात एकदम रोडावली तेव्हा या लाकडांचे करायचे काय म्हणून चंदनातून तेल काढण्याचा कारखाना सुरू केला. तेव्हा महाराजांना खूष करण्यासाठी कारखान्यातील कामगारांनी या तेलापासून साबण तयार करून तो राजाला नजर केला आणि यातूनच नवा इतिहास घडला. विश्वेसरैय्या अतिशय बुद्धीमान होते. त्यांनी या चंदनी साबणाची कुवत जाणली व मोठ्या प्रमाणावर साबण उत्पादनाला प्राधान्य दिले.


साबण तयार करताना शुद्धतेशी समझौता करायचा नाही असा निर्णय घेतला पण साबणाची किंमत आटोक्यात ठेवली तरच प्रत्येकाला तो वापरणे शक्य होणार हे लक्षात येताच युवा वैज्ञानिक शास्त्री यांची मुंबईत भेट घेऊन त्यांना साबण कसा बनवायचा याचे शास्त्रशद्ध शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला पाठविले गेले. त्यांनी हे शास्त्र इतके आत्मसात केले की लोक त्यांना सोप शास्त्री म्हणूनच ओळखू लागले. त्यांनी या साबणाची मानके ठरविली व त्यानुसार बंगलोर येथे कारखाना सुरू झाला.


या साबणाला युनिक व फॅन्सी आकार देण्याचे श्रेयही शास्त्रींकडेच जाते. तो आकर्षक वाटावा म्हणून कागदात बांधून दिला जाई व त्याचा ओव्हल शेप फारच खास ठरला. आजही हा शेपच लोकप्रिय आहे. इतकेच नव्हे तर राजपरिवाराशी त्याचे असलेले नाते लक्षात घेऊन त्याची बॉक्स ज्युवेलरी बॉक्सप्रमाणे तयार केली गेली. त्यामुळे त्याला रॉयल लूक मिळाला.


या साबणाची माहिती देशभर पोहोचावी म्हणून तेव्हाही जाहिरातीचा वापर केला गेला. गावोगावी साईन बोर्डवर तो झळकला तर कराचीत उंटांच्या ताफ्यावरून त्याची जाहिरात केली गेली. पाहता पाहता म्हैसूर सॅडल सोपची लोकप्रियता वाढू लागली. परदेशी राजघराण्यांकडूनही त्याला मागणी येऊ लागली. मात्र १९९० च्या दशकात मल्टी नॅशनल कंपन्यांच्या आगमनाने त्याच्यापुढे आव्हान उभे केले. इतके की कंपनी तोट्यात गेली. मात्र कंपनीने त्यावेळी सावधानता दाखवत साबणाबरोबरच पावडर, तेले, उदबत्ती, सेंट अशी अनेक उत्पादने बाजारात आणली व २००३ पर्यंत सर्व तोटा भरून काढून नफा कमावला.

गेल्या वर्षी या कंपनीचा टर्नओव्हर होता ७७६ कोटींचा व निव्वळ नफा होता ६० कोटी रूपयांचा. आज अनेक सँडल सोप बाजारात आहेत पण १०० टक्के शुद्धता राखलेल्या म्हैसूर सँडल सोपला तुलना नाही.