अजब कायदेकानून असलेला उत्तर कोरिया


कोणत्याही विचित्र गोष्टी नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. जगभरातील विविध देशही त्यांच्या विचित्र कायद्यांमुळे चर्चेत असतात. मात्र कांही देशांचे कायदे आपल्याला धक्का देऊन जातात. असे धक्केदायक कायदे असणार्‍या देशात पहिला नंबर लागेल तो उत्तर कोरियाचा. हे कायदे ऐकले की आपण असल्या देशात राहात नाही हे आपले सौभाग्य आहे असे वाटल्यावाचून राहणार नाही.


आजकाल उठसूठ आपण फोन करतो. घराबाहेर गेलो तरी घरच्यांशी फोनवरून संपर्कात असतो. पण यदाकदाचित तुम्ही उत्तर कोरियात गेलात आणि तेथून घरी फोन केलात तर तुरूंगाची हवा खाण्याची पाळी नक्की येणार हे लक्षात घ्या. कारण येथून आंतरराष्ट्रीय कॉल करण्यास बंदी आहे. इतकेच काय दुसर्‍या कोणत्याही देशाचे संगीत तुम्ही येथे ऐकू शकत नाही.

या देशाच्या नेतृत्त्वाबद्दल कांही बोलणे म्हणजे कठोर शिक्षेचे धनी होणे आहे. किमजोंग उन व त्यांच्या परिवाराविरोधात कांही चुकून जरी बोलले तरी तो इशनिंदेचा गुन्हा मानला जातो व त्याला मृत्यदंडाची शिक्षाही होऊ शकते.


या देशात सरकारी नोकरीत असलेल्या पुरूषांनाच कार चालविण्याची परवानगी आहे. महिलांना नाही. येथे महिला वाहतूक नियंत्रक पोलिस म्हणून काम करतात पण त्यांना वाहन चालविण्याची बंदी आहे. या देशात १०० व्यक्तींमागे १ कार असे कारचे प्रमाण आहे.


येथे ८ जून या दिवशी सार्वजनिक ठिकाणी हसण्याची किवा हलके स्मित करण्याची परवानगी नाही कारण या दिवशी सध्याचा हुकुमशहा किमजोंग उन याचे वडील सिनियर किमजोंग यांचा १९९४ साली मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा दिवस येथे राष्ट्रीय शोकदिन म्हणून पाळला जातो. हसण्याबरोबरच या दिवशी पार्टी करणे, नाचणे, गाण्यावरही बंदी आहे. या दिवशी मदिरापानही करता येत नाही.


उच्चाधिकार्‍यांच्या बैठकीत चुकून कुणाचा डोळा लागला किंवा त्याने डुलकी घेतली तर त्याचा जीव गेला म्हणूनच समजायचे. किमजोग घेत असलेल्या एका बैठकीत रक्षा मंत्र्यालाच डुलकी आली तर त्याला तोफेने उडवून ठार केले गेले.

येथे कपडे कसे व कोणते घालायचे याचे नियम आहेत. त्यानुसार जीन्सवर बंदी आहे कारण ती भांडवलशाहीचे प्रतीक मानली जाते. येथे पुरूष वर्ग २८ प्रकारचे व महिला १४ प्रकारचे हेअरकटच करू शकतात. राजमान्य असलेले हेअरकट नुसारच केस कापावे लागतात.