संयुक्त अरब अमिरातीमध्ये ही कृत्ये आहेत बेकायदेशीर


संयुक्त अरब अमिरातीतील बहुतेक ठिकाणे पर्यटकांचे आकर्षण ठरत असली तरी येथे, तेथील स्थानिक रहिवासी आणि फिरायला आलेले पर्यटक या सर्वांनाच काही नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. या नियमांच्या विरुद्ध जाऊन कोणतीही कृत्ये करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात येऊन तुरुंगाची हवा देखील खावी लागण्याची शक्यता असते. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांनी येथील नियमांची आधीपासूनच माहिती करून घेणे अगत्याचे आहे.

संयुक्त अरब अमिरातीमध्ये सार्वजनिक ठिकाणी फिरताना तुम्ही कशा प्रकारचे कपडे घालावयास हवेत याबद्दल काही नियम आहेत. त्यामुळे येथील लोकांना आपत्तीजनक वाटतील असे कपडे घालणे बेकायदेशीर समजले जाते. तसेच येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यपानालाही बंदी आहे. येथे मद्यपान करणाऱ्यांसाठी सरकारमान्य क्लब्स किंवा हॉटेल्स आहेत, केवळ तेथेच मद्यपानास अनुमती असून, त्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी जर एखादी व्यक्ती मद्यपान करताना आढळली, किंवा एखादी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी नशेच्या धुंदीमध्ये आढळली, तर त्या व्यक्तीला अटक होऊन तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते. त्याचप्रमाणे ड्रग्स विकणे, बाळगणे किंवा विकत घेणे याविरुद्ध येथे कडक कायदे आहेत.

बहुतेक पर्यटकांना जिथे फिरायला जातील, तेथील स्थानिक रहिवाशांची छायाचित्रे काढण्याची आवड असते. उद्देश हा, की त्या छायाचित्रांच्या माध्यामातून तेथील रहिवाशांची राहणी, त्यांची वेशभूषा इत्यादी समजावी. पण संयुक्त अरब अमिराती मध्ये तुम्ही कुठल्याही व्यक्तीच्या अनुमतीशिवाय तिचे छायाचित्र काढू शकत नाही. असे करणे बेकायदेशीर असून, त्यासाठी चांगला भरघोस दंड भरावा लागतो. विशेषतः एखाद्या व्यक्तीचे छायाचित्र टिपून ते सोशल मीडिया ( फेसबुक, इन्स्टाग्राम ) वर अपलोड करणाऱ्यांविरुद्ध रीतसर गुन्हा नोंदविता येतो. तसेच, येथे सार्वजनिक ठिकाणी अपशब्दांचा वापर करणे हा देखील कायद्याने गुन्हा आहे.

रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये येथे सार्वजनिक ठिकाणी अन्नाचे सेवन करणे, धूम्रपान करणे, च्युईंग गम चघळणे कायद्याने मना आहे. या महिन्यामध्ये बहुतेक मुस्लीम बंधू सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करीत असतात. त्या काळामध्ये हे उपवास लक्षात घेऊन बहुतेक रेस्टॉरंट्सच्या दरवाजे आणि खिडक्यांवरही पडदे लावले जातात. त्यामुळे उपवासाच्या काळामध्ये सार्वजनिक ठिकाणी अन्नग्रहण करणे किंवा धूम्रपान करणे हे अपमानकारक समजले जाते. तसेच कुठल्याही समाजकल्याणाशी निगडीत कार्याचा, सरकारी परवानगीशिवाय सोशल मिडिया वर प्रसार करणेही बेकायदेशीर आहे. त्याशिवाय येथील सरकारविरुद्ध किंवा कोणत्याही सरकारी धोरणांविरुद्ध सोशल मिडीयावर मतप्रदर्शन करणे ही कायद्याच्या विरुद्ध आहे.

जेव्हा येथील स्थानिक लोकांशी गाठभेट घेण्याचा प्रसंग येईल तेव्हा त्यांच्याशी आपण होऊन हस्तांदोलन करणे किंवा आलिंगन देणे या गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात. तसेच आपल्या जोडीदारासमवेत फिरायला गलेले असतानाही सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारची शारीरिक जवळीक टाळावी. कुठल्याही प्रार्थनास्थळाला किंवा एखाद्या स्थानिक रहिवाश्याच्या घरी भेट देण्याचा प्रसंग आला, तर आपली वेशभूषा येथील रीतीला धरून असणे आवश्यक आहे. येथील प्रार्थनास्थळामध्ये किंवा घरांमध्ये बूट किंवा चप्पल घालून प्रवेश करू नये. येथील चालीरीती जशा आहेत, त्याप्रमाणे आपले वर्तन असणे श्रेयस्कर आहे.

Leave a Comment