अय्यर यांचा घरचा अहेर


कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन भाषणे ठोकून मोठा पराक्रम केला आणि तिथे आपल्या पक्षातल्याच नाही तर देशातल्या घराणेशाहीची कबुली दिली. आपला देश सगळ्याच क्षेत्रात घराणेशाहीवर चालतो हे त्यांनी मान्य केले पण आपण ही घराणेशाही कधी मोडून काढणार आहोत हे काही त्यांनी सांगितले नाही. अर्थात तेवढा प्रामाणिकपणा त्याना दाखवता आला नाही. ही घराणेशाही केवळ पंतप्रधानपदापुरतीच नाही तर ती पक्षाच्या अध्यक्षपदातही आहे. म्हणून पंतप्रधान होता येईल तेव्हा येईल पण आता कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर तरी घराण्याच्या वारशाप्रमाणे आरूढ होण्याच्या त्यांच्या हालचाली सुरू आहेत. पण या घराणेशाहीला त्यांच्याच पक्षातले काही नेते वैतागले आहेत. आपला पक्ष या घराणेशाहीमुळेच मागे पडत आहे. तेव्हा पक्षाला लागलेले हे ग्रहण कधीतरी सुटावे असे त्यांनाही वाटते.

आता गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेले माजी ग्रामीण विकास मंत्री मणिशंकर अय्यर यांनी पक्षाला घरचा आहेर ेदिला आहे. आमच्या पक्षात पक्षाचा अध्यक्ष आई किंवा मुलगाच होऊ शकतो अशा शब्दात त्यांनी आपला वैताग व्यक्त केला आहे. अर्थात या गाय वासराची ही निवडणूक बिनविरोध करून पक्ष त्यांच्या मागे उभा असल्याचे चित्र छान उभे केले जाईलच. म्हणजे दोघांत एकाची निवड बिनविरोधच होईल त्यांची नावे समोर येतील तेव्हा त्यांना कोणी विरोध करणारच नाही. पण कोणी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केलाच तर निवडणूक लावली जाईल आणि निवडणुकीच्या मार्गाने आई किंवा मुलगा यापैकी कोणाला तरी निवडून आणले जाईल.

एकंदरीत कॉंग्रेसला पडलेला घराणेशाहीचा वेेढा ढिला होण्याची काही चिन्हे नाहीत. कॉंग्रेस पक्ष हा तळागाळात पसरलेला पक्ष आहे. समाजतला सर्वात शेवटचा माणूस हे कॉंग्रेेस पक्षाचे लक्ष्य आहे तर मग या वर्गातून एखादा माणूस निर्माण करून त्याला पक्षाचा अध्यक्ष का केले जात नाही ? उलट असा कोणी तरी सामान्य माणूस पक्षाचा अध्यक्ष होईल तर पक्षाविषयी सामान्य माणसाला असलेला आदरही वाढेल. पण या पक्षाला आता आपल्या अस्तित्वाचा प्रश्‍न पडलेला नाही तर गांधी घराण्याच्या अस्तित्वाचा प्रश्‍न पडला आहे. घराण्यासाठी पक्षाचा बळी दिला जात आहे. स्वातंत्र्यासाठी संघर्ष केलेल्या पक्षाला स्वत:ची घराण्यापासून सुटका करून घेता येत नाही. पक्षाला लांब पल्ल्याची धोरणे आखणारे नेतृत्वच राहिलेले नाही.

Leave a Comment