पोटनिवडणुकांत भाजपाची कसोटी


देशाला गुजरात आणि कर्नाटक विधानसभांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत आणि त्यांत कोण बाजी मारणार यावर लोकांच्या पैजा लागल्या आहेत. मात्र त्याआधी लोकसभेच्या आठ जागांवर पोटनिवडणुका होणार असून या पोटनिवडणुकांत भाजपाच्या लोकप्रियतेचा खरा कस लागणार आहे. या आठापैकी पंजाबातल्या एका जागेवर तर आताच निवडणूक होत आहे. चित्रपट अभिनेता विनोद खन्ना याच्या निधनाने मोकळ्या झालेल्या या जागेवर बुधवारी (११ ऑक्टो.) मतदान असून १५ ऑक्टोबरला या निवडणुकीचा निकालही लागणार आहे. हा मतदारसंघ गुरूदासपूर हा आहे. सध्या आपल्या देशातल्या विरोधकांनी अर्थव्यवस्था मोठी अडचणीत असल्याचा प्रचार सुरू केला आहे. त्यांचा हा प्रचार लोकांपर्यंत पोचलाय की नाही याचा निर्णय या निवडणुकांत होणार आहे.

या निवडणुका देशाच्या निरनिराळ्या राज्यांत असल्याने त्यांच्यातून जनतेचा मूड राष्ट्रीय पातळीवर काय आहे याचा अंदाज येणार आहे. हा अंदाज येत्या लोकसभा निवडणुकीच्या संबंधाने महत्त्वाचा आहे. पोट निवडणुका होत असलेली राज्ये राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब आणि प. बंगाल अशी आहेत. या राज्यात केवळ भाजपाचा जोर नाही. राजस्थान आणि उत्तर प्रदेशात भाजपा समर्थ आहे. तिथे आता भाजपाच्या हातात सत्ता आहे. तेव्हा तिथल्या भाजपाच्या सरकारांबाबत जनतेचे मत काय आहे याचा अंदाज या पोटनिवडणुकांतून येणार आहे. बिहारकडे भाजपाचे जास्त लक्ष आहे कारण हिंदी भाषिक पट्ट्यातले हे राज्य लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळी भाजपाकडे फारसे कलले नव्हते कारण राज्यात भाजपाच्या हातात सत्ता नव्हती.

आता नितीशकुमार यांनी भाजपाशी हातमिळवणी केली असल्याने चित्र बदलले आहे आणि ते आता भाजपाला किती अनुकूल आहे हे या पोटनिवडणुकांतून कळणार आहे. राजस्थानात दोन मतदारसंघात पोटनिवडणूक आहे आणि त्या दोन्ही जागा भाजपाला जिंकाव्या लागतील कारण त्या दोन्ही जागा भाजपाने जिंकलेल्या होत्या. तिथल्या भाजपाच्या मुख्यमंत्री कितीण वसुुंधरा राजे या किती सक्षम आहेत याचीही कल्पना येणार आहे. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या दोन जागा गोरखपूर आणि फुलपूर यावर निवडणुका होणार आहे. योगी सरकार किती लोकप्रिय आहे हे या निवडणुकांतून कळणार आहे.