यंदाची दिवाळी चिनी मालासाठी ठरणार शिमगा


दिवाळी अगदी तोंडावर आली असताना चिनी मालाला भारतीय बाजारात कशी मागणी आहे या संदर्भात असोचेमने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात यंदाची दिवाळी चिनी मालासाठी शिमगा ठरणार असल्याचे दिसून आले आहे.२०१६ मध्ये ६५०० कोटींचा चिनी माल भारतात विकला गेला होता यंदा मात्र त्यात ५० टक्के घट होईल असे दिसून आले आहे.

दिवाळी साठी चिनी लाईटमाळा, रांगोळ्या, लक्ष्मी गणेश प्रतिमा, फटाके, भेट वस्तू, आकाशकंदिल, वॉल हँगिग असा अनेक प्रकारचा माल भारतात विक्रीसाठी येतो व त्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसादही असतो. चीन भारतातील तणावामुळे गतवर्षी चिनी मालाचा उठाव ३० टक्यांनी घटला होता. असोचेमने अहमदाबाद, बंगलोर,भोपाळ, चेन्नई, डेहराडून, मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, जयपूर, लखनौ अशा मोठ्या शहरातील ठोक व किरकोळ व्यापार्‍यांकडून गोळा केलेल्या आकडेवारीनुसार यंदा या चिनी मालाबरोबरच इलेक्ट्राॅनिक्स वस्तू व चिनी मोबाईलच्या मागणीतही १५ ते २० टक्के घट झाली आहे.