‘या‘ ठिकाणी फोटोग्राफी करण्यास आहे सक्त मनाई


परिवार किंवा मित्र मैत्रिणींसोबत आपण कुठे फिरायला गेलो असलो, किंवा काही सण समारंभ असला की ते आनंदाचे सर्व क्षण आपण आपल्या कॅमेरा मध्ये किंवा मोबाईल मध्ये कैद करून घेत असतो. उद्देश एवढाच, की ती छायाचित्रे बघताना आपल्याला मिळालेला आनंद आपल्या कायम आठवणीत राहावा. पण जगामध्ये काही ठिकाणे अशी आहेत, जी आहेत खूपच सुंदर, निसर्गरम्य, पण तिथली सुंदरता तुम्ही तुमच्या कॅमेरामध्ये कैद करू शकत नाही. म्हणजेच, अशी काही ठिकाणे आहेत जिथे फोटोग्राफीला मनाई आहे.

भारतातील आग्रामध्ये असलेला ताज महाल जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. अप्रतिम वास्तुशिल्पाचे उदाहरण असलेला ताज महाल बघताना भान हरपून जाते. ताज महालाभोवती असलेली बाग ही अतिशय सुंदर आहे. ही सगळी छायाचित्रे आपण टिपू शकत असला, तरी ताज महालाच्या अंतर्भागामध्ये एकदा का प्रवेश केला, की तेथील छायाचित्रे घेण्यास मात्र बंदी आहे. ताज महालाच्या अंतर्भागाध्ये असलेल्या समाधीस्थलांची छायाचित्रे घेण्याची परवानगी नाही. इथे तैनात असलेले सुरक्षा कर्मचारी अतिशय जागरूकपणे पर्यटकांवर लक्ष ठेऊन असतात.

जियांगसू नॅशनल सिक्युरिटी एज्युकेशन म्युझियम चीन मधील नान्जिंग या ठिकाणी आहे. ह्या म्युझियम मध्ये हेरगिरीशी संबंधित सर्व कागदपत्रे, उपकरणे ठेवलेली आहेत. काही कागदपत्रे तर जवळजवळ शंभर वर्षे जुनी आहेत. पण त्या कागदपत्रांमधील काही तपशील इतके संवेदनशील आहेत, की परदेशी नागरिकांना ते बघण्यास मनाई आहे. आणि जरी ही कागदपत्रे बघता आली तरी त्यांचे फोटो काढायची परवानगी नाही. ह्या म्युझियम मध्ये केवळ चीनी नागरिकांनाच प्रवेश आहे.

कुमसुसान पॅलेस ऑफ द सन ही उत्तर कोरियामधील प्योंगयांग ह्या ठिकाणी असलेली किम सोंग आणि किम जोंग-ईल यांची समाधीस्थळे आहेत. इथे प्रवेश करण्यापूर्वी सर्व लोकांना आपापल्या वस्तू तेथील सुरक्षा कक्षामध्ये जमा कराव्या लागतात. इथे कॅमेराच काय, पण तुमच्या अंगावरील धुळीचे कण देखील आतमध्ये नेण्यास मनाई आहे. प्रवेशद्वाराशीच असलेली भली मोठी डस्टिंग मशीन्स तुमच्या अंगावरील धूळ झाडतील आणि त्यानंतरच तुम्हाला आत प्रवेश करता येईल. येथे उत्तर कोरियाच्या दोन राष्ट्राध्यक्षांच्या समाधी काचेच्या पेटीमध्ये आहेत.

इटलीमधील रोम येथील व्हॅटिकन सिटीमध्ये असलेल्या सिस्टीन चॅपलमध्येही फोटोग्राफी करण्यास सक्त मनाई आहे. हे सिस्टीन चॅपल अतिशय प्राचीन असून अतिशय सुंदर कलाकृतींनी नटलेले आहे. तुम्हाला कदाचित वाटेल की हे चॅपल अतिशय पवित्र प्रार्थनास्थळ आहे म्हणून इथे फोटोग्राफी मना आहे, पण खरे कारण मात्र वेगळेच आहे. वीस वर्षांपूर्वी जपानच्या निप्पो टेलिव्हिजन नेटवर्क या कंपनीने सिस्टीन चॅपल च्या नूतनीकरणासाठी पैसे खर्च केले होते. त्यामुळे येथील फोटोग्राफीचे सर्व अधिकार या कंपनीच्या मालिकेचे आहेत. नूतनीकरणाचे काम चालू असताना येथे फोटोग्राफीसाठी मनाई करण्यात आली होती, पण आता नूतनीकरण झाल्यानंतरदेखील ही मनाई कायम ठेवण्यात आली आहे.

Leave a Comment