Skip links

अशी रोखा अॅसिडीटी


आजकालचा आपले जीवन धकाधकीचे झालेले असले, तरी या आपल्या जीवनशैलीमध्ये बैठी कामे जास्त वाढलेली आहेत. घरामध्ये देखील सर्व सुखसोयी असल्याने शारीरक श्रम कमी झाले आहेत. शारीरिक श्रम कमी झाल्याने खरे तर आपल्या शरीराला कमी अन्नाची गरज भासावयास हवी. पण तसे न होता, आपण खात असलेल्या अन्नाचे प्रमाण काही कमी झालले नाही. शिवाय आजकालच्या आपल्या खानपानामध्ये प्रोसेस्ड अन्नपदार्थांची संख्याही वाढली आहे. या सर्व गोष्टींव्यतिरिक्त कामाचा ताण, रात्रीची, वेळी – अवेळी किंवा अपुरी झोप, या सगळ्या कारणांमुळे अॅसिडीटी होण्याची तक्रार वाढीला लागली आहे. अॅसिडीटी हा विकार पोटामधील पाचनरसांच्या असंतुलनामुळे उद्भवतो. पोट दुखणे, मळमळणे, गॅसेस होणे, डोकेदुखी, क्वचित प्रसंगी उलट्या होणे, ही सर्व अॅसिडीटीची सर्वसामान्यपणे आढळणारी लक्षणे आहेत. पण अॅसिडीटीचा त्रास होऊ लागताच औषधे घेण्यापेक्षा काही घरगुती उपायांच्या मदतीने अॅसिडीटी कमी करता येऊ शकते.

अॅसिडीटीचा त्रास होऊन पोटात जळजळ होत असल्यास एक ग्लास गार दुधामध्ये साखर घालून, हे दूध थोड्या थोड्या वेळाने थोडे थोडे पीत राहावे. दुधामध्ये असलेल्या कॅल्शियममुळे पोटातील अॅसिड्स संतुलित होऊन पोटातील जळजळ थांबते. त्याचप्रमाणे तुळशीची पाने चावून खाल्ल्याने ही पोटामधील पाचनरस संतुलित होऊन अॅसिडीटीचा त्रास नाहीसा होतो. केळ्यामधील अधिक मात्रेमधील पोटॅशियम आणि फायबर मुळेही पोटामधील अॅसिड्सचा प्रभाव कमी होतो, त्यामुळे अॅसिडीटीचा त्रास होत असल्यास पिकेलेले केळे खावे.

बडीशेपेमध्ये पोट थंड ठेवणारी तत्वे असून, त्याच्या सेवनाने बद्धकोष्ठाचा विकारही दूर होतो. बडीशेपेच्या सेवनाने पोटामध्ये अल्सर होत नाहीत. म्हणूनच आपल्याकडे जेवणानंतर बडीशेप खाण्याची पद्धत आहे. अॅसिडीटीचा त्रास ज्यांना वारंवार होतो, अश्या व्यक्तींनी एक मोठा चमचा बडीशेप रात्रभर एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालावी, व दुसऱ्या दिवशी हे पाणी थोडे थोडे पीत राहावे. तसेच अॅसिडीटी होत असल्यास, हिरव्या वेलचीचे काही दाणे पाण्यामध्ये उकळून घेऊन हे पाणी प्यायल्यानेही आराम पडतो.

गुळामध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असल्याने जेवणानंतर गुळाचा लहान खडा चघळल्यास अॅसिडीटीचा त्रास होत नाही. गुळाचा खडा पाण्यामध्ये घालून गूळ विरघळल्यानंतर ते पाणी प्यायल्याने ही आराम मिळतो. नारळाचे पाणी, आल्याचा रस, जिरे भिजत घातलेले पाणी हे सर्व अॅसिडीटी दूर करण्यास उपयुक्त आहेत.

Web Title: for acidity home remedy