चिकनगुणिया प्रतिबंधक लस


रुरकी येथील आयआयटी मध्ये चिकनगुणिया या आजाराविरुद्ध प्रतिबंधक लस शोधण्याचे काम जारी असून त्यादृष्टीने उपयुक्त ठरू शकणार्‍या पिपरेझाईन या रसायनातील चिकनगुणिया विरोधी गुणधर्माचा छडा लागला आहे. शिवाय हो द्रव्य चिकनगुणियाला प्रतिबंध करण्यास कसे उपयुक्त ठरेल याचाही अंदाज आला आहे. या संबंधात करण्यात आलेल्या निरीक्षकांची माहिती कोलंबियातल्या या विषयावरील एका नियतकालिकांत प्रसिद्ध करण्यात आली आहे. चिकनगुणिया कोणालाही होऊ शकतो. त्यावर कसलेही औषध नाही. तो विषाणूंमुळे होतो आणि तो झाल्यास रुग्णाचे अंग दुखते आणि त्याला ताप येतो. त्यावर औषध नसल्याने या लक्षणावरच उपाय केले जातात.

या विकाराने कोणी जीवास मुकत नाही पण एकदा या आजारातून उठल्यावर नंतर बरेच दिवस अशक्तपणा जाणवत रहातो. विषाणूमुंळे होणार्‍या म्हणजे व्हायरल रोगांच्या बाबतीत असेच होते. रुग्ण दगावत नाही पण हा आजार काही दिवसांनी आपोआप कमी होतो. आजारातले अंग दुखणे, ताप अशा लक्षणांवरच उपचार केले जातात आणि नंतर काही दिवस अशक्तपणा जाणवत रहातो. त्यामुळे हा आजार आपल्याला अजिबात होता कामा नये असे वाटत असले तरीही तसा कसलाच प्रतिबंध करता येत नाही. म्हणून असे विकार मुळात होऊच नयेत यावर काही उपाय सापडला तर बरे असे वाटत होते. पण आता हा शोध भारतातच लागला आहे.

चिकनगुणिया हा भारतात मोठी चिंता निर्माण करणारा विषय झाला आहे. दरसाल या आजाराने अनेक लोक आजारी पडून त्यांची शारीरिक क्षमता कमी होत चालली आहे म्हणून या आजाराची लस शोधणे गरजेचे झाले होते. रुरकी येथील आयआयटीच्या जैव तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. शेली तोमर यांनी या संबंधात होत असलेल्या संशोधनात गुंतलेल्या गटाचे नेतृत्व केले आहे. त्यांनी या संशोधनाचे तपशील सांगितले. नवी लस तयार करण्याची प्रक्रिया फार मोठी असते. एकदा त्यासाठीचा मॉलीक्यूल सापडला म्हणजे त्यापासून तयार झालेले औषध मान्य होऊन ते बाजारात यायला दहा वर्षांचा कालावधी लागतो म्हणून या संस्थेने चिकनगुणियावर सध्या जी औषधे वापरली जातात त्यांच्यावरच संशोधन करून नवी लस तयार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात आता यश येईल अशी आशा निर्माण झाली आहे.