गणितासाठी नोबेल पुरस्कार का नाही?


सध्याच्या काही दिवसांमध्ये वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये असामान्य कामगिरी केलेल्या व्यक्तींना नोबेल पुरस्कार जाहीर झाले आहेत. पण मनुष्यजातीच्या विकासासाठी महत्वाचे योगदान असलेला गणित विषय, आणि पर्यायाने गणितज्ञही या सम्मानापासून अजूनही वंचितच आहेत. आल्फ्रेड नोबेल यांनी ह्या पुरस्काराची सुरुवात केली. नोबेल हे स्वतः असामन्य बुद्धिमत्ता लाभलेले वैज्ञानिक असून, डायनामाईट च्या शोधाचे श्रेय सर्वस्वी त्यांचेच आहे. त्यांच्या नावे ३५५ इतर पेटंट्स ही आहेत. नोबेल यांनी आपली सर्व संपत्ती १८९६ साली नोबेल पुरस्काराची सुरुवात करण्याकरिता खर्ची घातली. अनेक क्षेत्रांमधील विशेष कामगिरीसाठी नोबेल पुरस्कार देताना मात्र गणित हे क्षेत्र नोबेल यांनी का वगळले असावे, या बद्दल निरनिराळे अंदाज व्यक्त केले जातात.

नोबेल पुरस्कार हे निरनिराळ्या क्षेत्रातील समाजोपयोगी शोधांकरिता किंवा कार्यांकरिता दिले जातात. गणित हा विषय केवळ ‘ थियरी ‘ असून, त्याचे वास्तविक जीवनात तितकेसे महत्व नाही असे नोबेल यांना वाटल्यामुळे त्या क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार दिला जात नाही असा एक प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो. नोबेल हे स्वतः रसायानशास्त्र आणि भौतिकशास्त्राचे अभ्यासक होते. साहित्य, वैद्यकशास्त्र या विषयांमध्ये ही त्यांना रुची होती. त्यांनी स्वतः डायनामाईट सारख्या विध्वंसक पदार्थाचा शोध लावला होता. त्यासाठी त्यांची थोड्याफार प्रमाणत आलोचानाही झाली. मग स्वतःची प्रतिमा सुधारण्याकरिता त्यांनी नोबेल शांतता पुरस्कार देण्यासही सुरुवात केली. पण गणितामध्ये मात्र त्यांना अजिबात रुची नसल्याने नोबेल पुरस्कारासाठी त्यांनी गणित या क्षेत्राचा विचारच केला नसल्याचे म्हटले जाते.

स्वीडन आणि नॉर्वे चे राजे ऑस्कर ( दुसरे ) हे स्वतः अतिशय बुद्धिमान गणितज्ञ होते. त्यांच्या पुढाकाराने गणिताच्या क्षेत्रामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या गणितज्ञांसाठी पुरस्कार देण्याची परंपरा सुरु झाली. त्यानंतर गणित या विषयासाठी एक पुरस्कार आधीपासूनच असताना अजून एक पुरस्कार कशासाठी, असे वाटून नोबेल यांनी गणित या विषयाचा पुरस्कारासाठी विचार केला नसेल असा अजून एक कयास आहे.

नोबेल यांचे विचार, त्यांच्या समकालीन असलेल्या गोस्टा मिटाग लेफ्लर यांच्याशी अजिबात जुळत नसत. लेफ्लर हे प्रसिद्ध गणितज्ञ होते. त्यांच्या सल्ल्यानुसारच स्वीडन चे राजे ऑस्कर यांनी गणित विषयासाठी पुरस्कार देण्यास सुरुवात केली. शिवाय नोबेल यांच्याबरोबर काम करणाऱ्या त्यांच्या भागीदाराने, नोबेलना सोडून लेफ्लर यांच्याबरोबर काम करण्यास सुरुवात केली असे म्हटले जाते. या कारणांसाठी नोबेल यांनी नाराज होऊन, गणित विषयासाठी पुरस्कार आणि बक्षिसाची रोख रक्कम द्यायची नाही असे ठरविले. तेव्हापासून गणित या विषयासाठी नोबेल पुरस्कार दिला जात नाही.

Leave a Comment