वजन घटविण्यास सहायक “ सुपर फूड्स “


वजन घटविण्याच्या एकंदर कवायतीत ‘सुपर फूड्स’ वापरणे उपयुक्त ठरू लागलेले आहे. सुपर फूड्स अश्या अन्नपदार्थांना म्हटले गेले आहे, ज्यांच्या सेवनाने वजन घटविण्यास मदत तर मिळतेच, शिवाय आपल्या शरीराला आवश्यक असे सर्व प्रकारचे पोषण ही मिळते.

बदाम हा अन्नपदार्थ आपल्या शरीरास अनेक प्रकारे उपयुक्त आहे. बदामाच्या सेवनाने बुद्धीमत्ता तीक्ष्ण होते हे ज्ञान फार पूर्वीपासूनचे आहे. तसेच बदामाच्या सेवनाने वजन घटविण्यासही मदत मिळते. बदामामध्ये असले एल अर्जेनाईन हे अमिनो अॅसिड व्यायामाच्या वेळी शरीरातील फॅट्स वेगाने वापरले जाण्यास मदत करते. याचमुळे बदामाला नैसर्गिक ‘वेट लॉस पिल’ असेही म्हटले गेले आहे. या सुपर फूडचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी बदाम आपल्या दैनंदिन आहारात जरूर समाविष्ट करावा. रोज रात्री बदाम पाण्यामध्ये भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी खावेत. साधारण पाच ते सात बदामांचे सेवन आपल्या दररोजच्या आहारामध्ये असावे.

वजन एकदा कमी झाले की ते तसेच टिकवून ठेवणे हे ही मोठेच काम असते. त्या कामी ओटमील आपली मदत करू शकते. ओटमील मध्ये बीटा ग्लुकोन नावाचे फायबर असते, ज्यामुळे ओटमील खाल्ल्यानंतर पुष्कळ वेळपर्यंत पोट भरलेले राहून लवकर भूक लागत नाही. तसेच ओटमील मध्ये कॅलरीजची मात्रा अतिशय कमी असून अन्य ‘ रेडी टू ईट’ नाश्त्यांच्या पदार्थांच्या मानाने फायबरही मुबलक प्रमाणात असते. साधारण दीड कप ओटमील मध्ये १५० कॅलरीज असतात.

वजन घटविण्यास सहायक अशा सुपर फूड्स मध्ये अगदी सहज उपलब्ध असते ते म्हणजे संत्रे. अँटी ऑक्सिडंट्स भरपूर मात्रेमध्ये असणारे हे फळ शरीरातील कोलेस्टेरोल कमी करण्यास उपयुक्त आहे. संत्र्याच्या नियमित सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते व त्वचाही नितळ, सुंदर दिसू लागते. एका पूर्ण संत्र्यामध्ये केवळ ५९ कॅलरीज असतात. संत्र्यामध्ये फायबरही मुबलक असून त्याच्या सेवनाने भूक लवकर शमते.

मसूर, राजमा यांसारखी कडधान्ये फायबर आणि प्रथिनांनी परिपूर्ण असतात. यामध्ये स्टार्च ही असतो. कडधान्यांच्या सेवनाने वजन घटवित असताना देखील शरीरातील ताकद चांगली टिकून राहते व अशक्तपणा जाणवत नाही. कडधान्यांप्रमाणेच जवस ही वजन घटविण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. यामध्येही फायबरचे प्रमाण खूप जास्त आहे. तसेच जवसामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड्सही आहेत. आजवर केल्या गेलेल्या अनेक शास्त्रीय अभ्यासांमध्ये हे निदान केले गेले आहे की ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स वजन घटविण्यास सहायक असून हृदयाच्या आरोग्याकरिताही अतिशय गुणकारी आहेत. जवस भाजून त्याची पूड करून घेऊन ही पूड आपले ज्यूस, स्मूदी, दही व ताकामध्ये मिसळून सेवन करावी.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment