भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषा ‘या’ लिपीद्वारे वाचता येणे होणार शक्य


(फोटो सौजन्य-Newz Hook)
भारतातील सर्व भाषा वाचू शकेल अशी एकच लिपी ‘भारती‘चा विकास आयआयटी मद्रास मधील वैज्ञानिकांची टीम करीत आहे. ही लिपी संपूर्णपणे तयार झाल्यानंतर या लिपीद्वारे भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषा वाचता येणे शक्य होणार आहे. या लिपीच्या विकासामुळे भारतातील निरनिराळ्या प्रांतांमधील लोकांना परस्परांची भाषा समजण्यास अडचण होणार नाही.

ह्या लिपीची कल्पना व्ही श्रीनिवास चक्रवर्ती यांची असून, ते आयआयटी मधील बायोटेक्नॉलॉजी विभागामध्ये अध्यापक आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांना या लिपीची कल्पना सुचली. भारतामध्ये भाषा जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यांमधील प्राथमिक स्वर एकसमानच आहेत हे श्रीनिवास यांच्या लक्षात आले. त्यामुळे हे स्वर लक्षात घेऊन जर एखादी लिपी बनविली, तर तिच्या मदतीने सर्वच भाषा वाचता येऊ शकतील या विश्वासाने श्रीनिवास यांनी ‘ भारती ‘ च्या निर्माणाला सुरुवात केली.

‘भारती‘ मधील प्रत्येक स्वरासाठी एक अक्षर न बनविता, प्रत्येक स्वर – समूहाकरिता एक प्राथमिक अक्षर या लिपीमध्ये तयार करण्यात आले आहे, व त्यानंतर वेगवेगळ्या स्वरांमधील फरक दाखविण्यासाठी प्राथमिक अक्षरांमध्ये थोडेसे बदल करीत ही लिपी तयार केली गेली आहे. प्रत्येक भाषेचे स्वतःचे असे खास स्वर असतात, जे इतर भाषांमध्ये आढळत नाहीत. अश्या स्वरांसाठीही अक्षरे, या लिपीमध्ये तयार केली गेली आहेत.

काही राज्यांमधील रस्त्यांवरील सूचनाफलक तेथील स्थानिक बोली भाषेमध्ये असून, बाहेरून आलेल्या पाहुण्यांना हे फलक वाचता येत नाहीत. पण आता या लिपीच्या विकासामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये पर्यटनाच्या किंवा कामाच्या निमित्ताने आलेल्या व्यक्तींना भाषेची अडचण जाणविणार नाही. तसेच ही लिपी अतिशय सोपी असल्याने डिस्लेक्सिया असणाऱ्या व्यक्तींनाही ही लिपी वाचण्यास अवघड होणार नाही, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. ही लिपी जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने, या लिपीमध्ये निरनिराळ्या शब्द्कोड्यांचे निर्माण सुरु असून, त्यासाठी लवकरच एक मोबाईल अॅप सुरु होत आहे.

Leave a Comment