खरेदी करताय? मग घासाघीस करायला शिका


आता सणउत्सवांचा काळ सुरू झाला आहे. कोणताही उत्सव खरेदीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मग ही खरेदी कपड्यांची असो, दागदागिन्यांची असो, किराणा मालाची असो, भेट वस्तूंची असो, ग्राहपयोगी वस्तूंची असो वा अन्य कोणतीही असो. खरेदी करताना चांगली वस्तू घेण्याइतकेच सर्वाधिक महत्त्व असते ते बार्गेनिग म्हणजेच घासाघाशीला. अनेकांना विक्रेत्याने सांगितलेली किंमत कमी करून मागणे अथवा किमतीबाबत त्याच्याशी घासाघीस करणे फारच अवघड वाटते. पण यामुळे नुकसान होते ते तुमचेच. तेव्हा बार्गेन करता येणे हेही चांगल्या ग्राहकाचे लक्षण आहे हे लक्षात घेऊन कांही पथ्ये सांभाळलीत तर तुम्हीही चांगले ग्राहक बनू शकता.

पहिले लक्षात घ्यायचे ते हे की दुकानदार कोणत्याही वस्तूची किंमत सांगतो तेव्हा खूपच कमी किंमतीत ती मागायची नाही तसेच सांगेल त्या किंमतीला घ्यायची नाही. याचा सुवर्णमध्ये साधायचा.


तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करणार असाल, मग ते घर, इलेक्ट्राॅनिक वस्तू, सजावटीचे सामान जे असेल ते, त्याच्या किंमती बाजारात जाण्याअगोदर जाणून घेणे आवश्यक आहे. या वस्तूंचे वेगवेगळे दर तुम्हाला आढळतील. पण त्यामुळे निदान सरासरी किमतीचा अंदाज नक्कीच येईल. चुकीची घासाघीस होणार नाही व दुकानदारही तुमचा गैरफायदा उठवू शकणार नाही.


दुकानात जाण्यापूर्वीच आपले बजेट ठरवा. बजेटबाहेरची वस्तू आपण खरेदी करत नाही ना यावर कटाक्ष ठेवा. यामुळे किंमतीत कुठपर्यंत ताणायचे हे ठरविणे सोपे जाईल. दुसरे हे लक्षात ठेवायचे की घासाघीस म्हणजे भांडण नव्हे. अनेकदा आपण आपल्याच किंमतीवर अडून बसतो मग शॉपिंगमधली मजा जाते. शिवाय रागारागात चांगला माल निवडणे कठीण होते व मूड खराब होतो. त्यामुळे शांत डोक्याने चांगली वस्तू निवडा व योग्य दरात ती खरेदी करा.


खरेदी करताना दुकानदाराच्या देहबोलीकडेही लक्ष असूद्या. तो तुम्ही मागितलेली प्रत्येक वस्तू हसतमुखाने दाखवत असेल तर ठीक. पण उडवाउडवी करत असेल तर त्याला वस्तु तुम्हाला विकण्यात इंटरेस्ट नाही हे लक्षात घ्या. अशा ठिकाणी घासाघीस करून कांहीच फायदा नसतो.


माल खरेदी करताना त्यात कधीतरी थोडाफार डिफेक्ट असतो. अशा वस्तू आणखी कमी किंमतीत मिळतात.आपल्याला नक्की कशा प्रकारची वस्तू हवीय व थोडा डिफेक्ट असेल तर वापर करताना कांही अडचण येणार नसेल तर अशी वस्तू आणखी किंमत कमी करून मिळू शकते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणींनी घेतलेली वस्तू डिट्टो आपल्या वस्तूसारखीच असेल तर त्यांना किंमत विचारू नका. कदाचित त्यांना ती तुमच्यापेक्षा स्वस्तात मिळालेली असेल तर तुमचा खरेदीचा आनंद मावळतो.

Leave a Comment