भारतीय खाटल्याला ऑस्ट्रेलियात मागणी


आजही भारताच्या ग्रामीण भागात आढळणारी खाट ही पारंपारिक वस्तू मोडीत निघत असताना याच खाटेला ऑस्ट्रेलियात मात्र चांगली मागणी येताना दिसत आहे. एका ऑस्ट्रेलियन कंपनीनेच ही खाट तेथेच तयार केली असून त्याला ट्रॅडिशनल इंडियन बेड असे नांव दिले आहे व अतिशय आरामदायी असे त्याचे वर्णन केले आहे. या खाटेच्या जाहिराती केल्या गेल्या असून तिची किंमत ९९९ डॉलर्स म्हणजे ६० हजार रूपयाच्या दरम्यान आहे.

जुन्या घरातून अंगणात कधीही टाकता येणारी, नारळाच्या काथ्याने चार पायांच्या लाकडी फ्रेममध्ये विणली जाणारी ही खाट चारपाई, खटिया व महाराष्ट्रात बाजले म्हणून परिचित आहे. पंजाबात ढाब्यांवर, घरातील सोप्यात, बाळंतिणीच्या खोलीत तिची उपस्थिती आवश्यक असे. मात्र आधुनिकतेचे वारे लागलेल्या भारतीयांनी ही बहुगुणी खाट आता केव्हाच अडगळीत टाकली आहे. भारतीयांची आधुनिकतेला प्राधान्य दिले असताना पाश्चिमात्य देश मात्र पारंपारिक भारतीय वस्तूंकडे वळत असल्याचे चित्र यातून दिसले आहे.

या खाटांना ऑस्ट्रेलियात चांगली मागणी येत असल्याचे पाहून भारतीयांना नवल वाटते आहे व त्याहून अधिक धक्का तिची किंमत ऐकून बसतो आहे.

Leave a Comment