‘ बाहुबली ‘ चित्रपटातील महिष्मती राज्य पुरातन काळी खरोखरच होते अस्तित्वात.


बाहुबली या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वरच्या कमाईचे सर्व विक्रम कधीच मागे टाकेल आहेत. या चित्रपटातील पात्रे, त्याची कथा, या सर्वांबरोबरच भरपूर गाजले, भव्य महिष्मती राज्य. बाहुबली या चित्रपटातील महिष्मती राज्य खरोखरच अस्तित्वात असल्याचे उल्लेख पुरातन ऐतिहासिक ग्रंथांमध्ये सापडतात. महिष्मती ‘ अवंती ‘ या राज्याचा एक भाग असल्याचे समाजते. अवंती हे प्राचीन भारतातील एक जनपद होते.

महिष्मती हे आताचे महेश्वर असल्याचे म्हटले जाते. महेश्वर हे ठिकाण मध्य प्रदेशामध्ये असून, नर्मदेच्या किनारी वसलेले आहे. येथील महेश्वरी साड्या, मंदिरे आणि किल्ले संपूर्ण देशभरामध्ये प्रसिद्ध आहेत. महिश्मान नावाच्या राजाने हे शहर वसविले होते. अवंती जनपदामध्ये दोन सत्ताकेंद्रे असून, उत्तरेकडील सत्ताकेंद्र उज्जैनी होते, तर दक्षिणेकडील सत्ताकेंद्र महिष्मती होते. महाभारतामधील अनुशासन पर्वामध्ये एक हजार हात असलेला कार्तवीर्यार्जुन एका ठिकाणी राहून संपूर्ण जगावर राज्य करीत असल्याचा उल्लेख आहे, ते ठिकाण महिष्मती असावे असा इतिहासकारांचा कयास आहे.

महिष्मती हे राज्य पूर्वी ‘ अनुप ‘ या नावाने ओळखले जात असल्याचा उल्लेख रघुवंशामध्ये सापडतो. यामध्ये महिष्मती रेवा नदीच्या किनारी वसलेले असून, अनुप देशाची राजधानी असल्याचे म्हटले आहे, तर काही कथांमध्ये, महिष्मती हे नर्मदेच्या किनारी वसलेले नसून, नर्मदेतील एक बेट होते असाही उल्लेख सापडतो. काही कथांच्या अनुसार नील राजाचे महिष्मतीवर अधिपत्य होते. अग्निदेवाने ब्राह्मण रूपाने नील राजाच्या मुलीशी प्रेमसंबंध जोडले. नील राजाला हे समजताच त्याने ब्राह्मणाला शिक्षा करण्याचे ठरविले. तेव्हा अग्निदेव आपल्या खऱ्या रूपात आले असता, नील राजाने त्यांना महिष्मती राज्याचे संरक्षणकर्ते होण्याची विनंती केली. रावणाने ही एके काळी महिष्मती राज्यावर चढाई केल्याचे ही उल्लेख सापडतात.

Leave a Comment