सर्व 3 अब्ज खाती हॅक झाली – याहूची कबुली


इंटरनेटच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हॅकिंगची कबुली याहू या बलाढ्य कंपनीने दिली असून आपल्या सर्व 3 अब्ज वापरकर्त्यांची खाती हॅक झाल्याचे म्हटले आहे. ही खाती 2013 साली हॅक झाली होती आणि आमच्या अंदाजापेक्षा हा आकडा तीन पट अधिक आहे, असे याहूने म्हटले आहे. विशेष म्हणजे हॅकिंग झाल्यानंतरही अनेकांनी याहूवर नवीन खाती बनविणे चालूच ठेवले होते.

कंपनीच्या या दाव्यामुळे याहूच्या शेअरधारक व वापरकर्त्यांनी दाखल केलेल्या खटल्यांचा विस्तार करण्यास मदत होणार आहे. हा खटला पुढे चालविण्यासाठी आता आमच्याकडे सर्व पुरावे आहेत, असे याहू वापरकर्त्यांचे वकील जॉन यांचुनीस यांनी सांगितले.

या हॅक झालेल्या खात्यांमध्ये बँकेशी संबंधित माहिती आणि अन्य वैयक्तिक माहिती समाविष्ट नाही, असे गुप्तचर संस्थांच्या तपासात आढळून आले आहे, असे याहूने म्हटले आहे. मात्र यात जुनी माहिती, बॅकअप ईमेल पत्तेही समाविष्ट होते आणि त्यातून वापरकर्त्यांच्या दुसऱ्या खात्यांमध्ये सहजपणे शिरकाव करता येणे शक्य होते, असेही कंपनीने म्हटले आहे.

Leave a Comment