या नवीन तंत्रज्ञानाने होते कुठल्याही वस्तूचे रिमोट कंट्रोलमध्ये रूपांतर


तुमच्या समोर चालत असलेल्या टीव्ही वरील वाहिनी, तुमच्या हातातील चहाचा कप जरासा हलवूनही बदलता आली तर? असे होणे खरच शक्य आहे? याचे उत्तर ‘ होय ‘ असे आहे. इंग्लंड मधील लँकॅस्टर विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एका अशा तंत्रज्ञानाचा विकास केला आहे, ज्याच्या मदतीने चहाच्या कपपासून ते लहान मुलांच्या एखाद्या खेळण्यापर्यंत कोणतीही वस्तू रिमोट कंट्रोल म्हणून वापरली जाऊ शकते. इतकेच काय, तर शरीराची माफक प्रमाणात केलेली हालचाल ही रिमोट कंट्रोलचे काम करू शकते.

“ मॅचपॉईंट टेक्नोलॉजी “ असे या तंत्रज्ञानाचे नाव असून, यासाठी एका सामान्य वेबकॅमची गरज असते. टीव्ही स्क्रीनच्या एका कोपऱ्यामध्ये एक गोलाकार ‘ विजेट ‘ असते, ज्यामध्ये टीव्हीचा आवाज वाढविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी, चॅनल बदलण्यासाठी पर्याय असतात. हे पर्याय टीव्ही बघणाऱ्या व्यक्तीने आपल्या हाताच्या हालचालींनी निवडायचे असतात. ह्या सॉफ्टवेअरला कुठल्याही प्रकारच्या ठराविक सेटींगची गरज नसून, शरीराची किंवा हातातील कुठल्याही वस्तूची हालचाल जाणून घेऊन ते सॉफ्टवेअर, तुमच्या इच्छेप्रमाणे टीव्ही वरचे चॅनल बदलू शकते.

ह्या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी कोणत्याही प्रकारच्या खास प्रशिक्षणाची गरज नसून, सरावाने ह्या तंत्रज्ञानाचा वापर सोपा होतो. हे तंत्रज्ञान टीव्ही कार्यक्रमांप्रमाणे यू ट्यूब व्हिडियो साठीही वापरता येते. आपण यू ट्यूब वरून एखदा पदार्थ बनवायला शिकत असाल, तर व्हिडियो ‘ पॉझ ‘, किंवा ‘ रिवाईंड ‘ करण्यासाठी हातातील चमचा बाजूला ठेवण्याची गरज नाही. हाताच्या नुसत्या हालचालीने आपण व्हिडियो पॉझ किंवा रिवाईंड करू शकता.

मॅचपॉईंट तंत्रज्ञानाद्वारे व्हाईट बोर्ड वरील आकृती देखील ‘ झूम ईन ‘ किंव ‘ झूम आउट ‘ केल्या जाऊ शकतात. आता रिमोट कंट्रोल सापडत नसला तरी काळजीचे कारण नाही, कारण घरातील कुठलीही वस्तू या नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रिमोट म्हणून वापरणे शक्य होणार आहे.

Leave a Comment