पुण्याच्या शास्त्रज्ञांचे ‘नोबेल’ मिळालेल्या संशोधनात सिंहाचा वाटा!


पुणे – गुरुत्वाकर्षणाच्या लहरीं संदर्भात केल्या गेलेल्या संशोधनास भौतिकशास्त्रामधील या वर्षीचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले असून हे संशोधन मांडण्यासाठी लिहिण्यात आलेल्या शोधनिबंधामध्ये भारतामधील नऊ संस्थांमधील एकूण ३७ भारतीय वैज्ञानिकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. पुणे शहरामधील खगोलविज्ञान व खगोलभौतिक (ऍस्ट्रोफिजिक्‍स) या क्षेत्रांत संशोधन करणाऱ्या आयुका संस्थेमधील वैज्ञानिकांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे.

रेनर वेस, बॅरी सी बारिश आणि किप एस थॉर्न या वैज्ञानिकांना गुरुत्वाकर्षाणाच्या लहरींच्या निरीक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या लायगो डिटेक्‍टरसाठी या वर्षीचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे. या संशोधनासाठी लिहिण्यात आलेल्या पहिल्या शोधनिबंधाचे आयुकामधील सुमारे १२ वैज्ञानिक सहलेखक होते.

भारताकडून या संशोधनासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्यात आले आहे. गुरुत्वाकर्षणाच्या लहरी शोधून काढण्याच्या प्रक्रियेत आवाजापासून (नॉईज) संकेत (सिग्नल) मिळविण्यासंदर्भात भारतीय संशोधकांनी मोठे योगदान दिले आहे. या संशोधनाला मिळालेल्या नोबेलमुळे भारतामधील लाइगो डिटेक्‍टर प्रकल्पास आता गती मिळेल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या संजीव धुरंधर यांनी सांगितले.

Leave a Comment