आंदोलनाचा फज्जा


राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेन्द्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली काल रेल रोको आंदोलन झाले. या आंदोलनात कार्यकर्ते कमी आणि पोलीस जादा होते. शेवटी कार्यकर्ते कितीही कमी असले तरीही पोलिसांची कुमक ही आधीच ठरलेली असते आणि ती जास्त असली तरी हा नेहमीच आढळणारा प्रकार असतो. पण या आंदोलनाची एक खासियत होती की आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांपेक्षा त्याचे वार्तांकन करायला आलेल्या पत्रकारांची संख्या जास्त होती. विशेष म्हणजे या आंदोलनाचे नाव रेल रोको असे असले तरीही त्यामुळे एकही रेल्वे एक मिनिटही थांबली नाही. कळवा रेल्वे स्थानकावर सरकारच्या विरोधात हे आंदोलन झाले. कॉंग्रेसचे असोत वा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे असोत पण या दोन्ही पक्षांचे नेते जाहीर सभासुद्धा मैदानावर न घेता सभागृहात घेतात आणि कोणालाही कसलाही त्रास न होता त्या सभा पार पाडतात. त्यांना ऊन सहन होत नाही. एसी मध्ये बसून समाजातल्या भेदांना खतपाणी घालण्याची कारस्थाने करून राजकारण करण्याची त्यांना एवढी सवय झाली आहे की, त्यांना कोणत्याही निमित्ताने उघड्यावर येणे जमत नाही.

त्यामुळे जितेन्द्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली झालेला हा रेल रोको अवघ्या दोन मिनिटांत आटोपला. ते आले, ते रुळावर बसले, चार दोन घोषणा देण्याइतपतही ते रुळावर थांबले नाहीत तोच पोलीस आले त्यांनी या आंंदोलनकर्त्यांना (?) अटक केली आणि रुळापासून दूर नेले. नंतर पोलीस ठाण्यात त्यांना चहापाणी करण्यात आले. तिथे थोडी सावली मिळाल्यामुळे त्यांना उसंत मिळाली आणि त्या वेळात त्यांनी घोेषणा देण्याचा उपचार पार पाडला. आंदोलन करण्यापूर्वी त्यांनी प्रवाशांना त्रास होणार नाही अशा बेताने आंदोलन करणार असे जाहीर केलेच होते. त्यानुसार त्यांनी केवळ प्रवाशांनाच नाही तर पोलिसांना आणि रेल्वे कर्मचार्‍यांनाही कसला त्रास होणार नाही याची दक्षता घेतली होती. रेल्वेच्या रूळावर घोषणा दिल्या असत्या तर त्यामुळे ध्वनिप्रदूषण झाले असते म्हणून त्यांनी नंतर पोलीस ठाण्यात मनातल्या मनात घोषणा दिल्या. त्यांनी आणखी एक चांगली गोष्ट केली. त्यांनी स्वत:लाही फार त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली. त्यांनी या आंदोलनाद्वारा रेल्वे जिन्यावरच्या चेंगरा चेंगरीविषयी खेद व्यक्त केला आहे तेव्हा आपण या आंदोलनाच्या निमित्ताने फार गर्दी जमा करायला गेलो तर आपल्याच गर्दीने चंेंगराचेंगरी व्हायची म्हणून त्यांनी आंदोलनकर्त्यांचीही फार गर्दी होणार नाही याचीही काळजी घेतली.

त्यांना बुलेट ट्रेनलाही विरोध करायचा होता. तो त्यांनी केला खरा पण खरे तर बुलेट ट्रेनने प्रवास करणारा हाच वर्ग आहे. आंदोेलन तर केले पाहिजे आणि आंदोलनातून आपण गरिबांचे कैवारी आहोत असा भास तर निर्माण केलाच पाहिजे. शेवटी आंदोलन आणि सरकारचा जमेल तेवढा विरोध हा त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये निदान काही प्रमाणात गर्दी जमा करण्याची आणि त्यासाठी पैसे खर्चण्याची तरी ताकद आहे पण मनसेचे काय ? त्यांच्यात तर कसलीच ताकद नाही. एखादा मोर्चा काढायचा तर तो नियोजित ठिकाणापर्यंत जाईल आणि त्यांचे नेते मोर्चा निघाल्यापासून त्या ठिकाणापर्यंत मोर्चात पायी सामील होतील याची कसलीही शाश्‍वती देता येत नाही. राज ठाकरे यांनी केन्द्र सरकारला इशारा दिला आहे. आपण मुंबईत बुलेट ट्रेेनची एकही वीट रचू देणार नाही. खरे तर त्यांच्यात तसे करण्याची अल्पशीही शक्ती नाहीच पण अशा प्रकारच्या वल्गना करण्याइतपत कार्यकर्तेही नाहीत. राज ठाकरे यांना दहा पाच मिनिटेही ऊन सहन होत नाही. सारखी एसी गाडी लागते.

रस्त्यावर उतरून आंदोलन करणारांची परंपरा फार वेगळी असते. त्यांचा जन्म रस्त्यावर गेलेला असतो. त्यांना पायपीट करण्याची सवय असते. त्यांना मैल न् मैल चालण्याचा सराव असतो. घोषणा देताना घशाला पडणारा ताण सहन करण्याची त्यांच्यात ताकद असते. मुळात एवढे सगळे सहन करून समाजाचा प्रश्‍न मांडला पाहिजे अशी समाजाच्या प्रश्‍नाविषयी तळमळ असते. त्या प्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी देहदंड सहन करण्याची तयारी असते. अशी तळमळ आणि अभिनिवेश हा समाजाच्या समस्यांच्या अभ्यासातून निर्माण झालेला असतो. तो अभ्यास आणि निरीक्षण करण्यासाठी बंगल्यातून बाहेर पडून समाजात मिसळावे लागते. यातली कोणतीही पूर्वतयारी नसताना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची घोषणा करणे हे हास्यास्पद ठरते. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगण्यात काही गैर नाही पण तशी ती बाळगताना आधी आडवा उभा महाराष्ट्र पायाखालून नाही तरी निदान गाडीत बसून तरी फिरलेला असला पाहिजे पण तसे काही न करता सावलीत बसून राजकारण करणे ही राजकारणाची कुचेष्टाच ठरते. जाहीर सभांमध्ये मोदींच्या नावाने शिमगा करणे सोपे आहे कारण घटनेने अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले आहे. पण मोदी हे दिल्लीपर्यंत कसे पोचले अाहेत याचा कधी विचार केला आहे का ? मोदी पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीही होण्याच्या आधी गुजरातेत चार वेळा जनसंपर्क यात्रा काढून अक्षरश: कोटी कोटी लोकांना प्रत्यक्षात भेटले आहेत. हे या कथित नेत्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.

Leave a Comment