सौदी महिलांसाठी कार कंपन्यांची जाहिरातबाजी


सौदी अरेबियामध्ये महिलांना वाहन चालविण्याची परवानगी मिळाल्याने तेथील महिला व सामाजिक कार्यकर्ते खूष झाले आहेतच पण त्यांच्याबरोबरीने जगातील आघाडीच्या कार उत्पादक कंपन्यांनीही आपला आनंद खास जाहिराती प्रसिद्ध करून व्यक्त करायला सुरवात केली आहे. सौदीत महिला जून २०१८ पासून प्रत्यक्षात कार चालवू शकणार आहेत व त्यांना रिझविण्यासाठी बड्या कार कंपन्यांनी जाहिरात युद्ध छेडले आहे. या जाहिराती करताना जाहिरात बनविणार्‍या अॅड एक्स्पर्टनी सौदी महिलांवर लक्ष केंद्रीत केले असल्याचे ठळकपणे दिसून येत आहे.


निस्सान ने एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्यात गाडीची नंबरप्लेट दाखविली गेली आहे. नंबर प्लेट वर २०१८ जीआरएल असे लिहिले गेले आहे. हा २०१८ नंबर म्हणजे सौदी महिलांना २०१८ सालात कार परवाना मिळणार आहे याचे निदर्शक आहे.


किया मोटर्सने त्यांच्या जाहिरातीतल नेल आर्ट म्हणजे नखांवरचे रंगकाम दाखविताना त्यात नखावर गाडी काढली आहे.


व्होक्सवॅगनने ट्वीटरवर केलेल्या त्यांच्या कारच्या जाहिरातीत काळ्या पार्श्वभूमीवर मेहंदीने रंगलेले दोन नाजूक हात कारचे ड्रायव्हिंग व्हिल पकडल्याच्या पोझमध्ये दाखविले आहेत.जाहिरातीला माय टर्न असे कॅप्शन दिले गेले आहे.


लँड रेाव्हरने त्यांचे जाहिरात कँपेन शेअर करताना महिलांच्या पर्समध्ये हमखास आढळणार्‍या सर्व वस्तू दाखविल्या आहेत. त्यात मेकअपचे सामान, लिपस्टीक पासून गॉगल, परफ्यूम अशा अनेक गोष्टी आहेत. यातच कारची किल्लीही दाखविली गेली आहे. तुमची प्रतिक्षा करते आहे असे त्याचे कॅप्शन आहे.

कॅडिलॅकने कारच्या अगदी कमी उघडलेल्या खिडकीतून पाहणारी तरूणी दाखविली आहे पण या तरूणीचेही पूर्ण दर्शन होत नाही. सांकेतिक फोटोतून त्यांनी सौदी महिलांना मिळालेल्या नव्या स्वांतत्र्यावर भाष्य केले आहे.

Leave a Comment