फेसबुकच्या नकारात्मक प्रभावांबद्दल झुकेरबर्गकडून क्षमायाचना


फेसबुकच्या नकारात्मक परिणामांबद्दल या सोशल मीडिया प्लेटफॉर्मचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने सार्वजनिक माफी मागितली आहे. या व्यासपीठाचा उपयोग लोकांना एकजूट करण्याऐवजी त्यांच्यात फूट टाकण्यासाठी करण्यात आला, यासाठी मला माफ करा असे त्याने म्हटले आहे.

झुकेरबर्ग याने कोणत्याही घटनेचा उल्लेख केलेला नाही. मात्र अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना पुढे आणण्यासाठी रशियाने प्रचार करण्यासाटी आणि मतदारांच्या भावनांना प्रभावित करण्यासाठी फेसबुकचा वापर केला, अशा बातम्या गेले काही दिवस येत आहेत. त्या बातम्यांशी झुकेरबर्ग याचे वक्तव्य जोडून पाहण्यात येत आहे. झुकेरबर्ग याने एक दशकापेक्षाही अधिक काळापूर्वी फेसबुकची निर्मिती केली होती.

‘‘ या वर्षी मी ज्यांना दुखावले आहे, त्यांची मी माफी मागतो तसेच आणखी चांगला होण्याचा प्रयत्न करेन. ज्या प्रकारे माझ्या कामाचा वापर लोकांमध्ये फूट टाकण्यासाठी करण्यात आला, त्यासाठी मी माफी मागतो. मी आणखी चांगले काम करण्याचा प्रयत्न करेन,’’ असे झुकेरबर्ग याने स्वतःच्या पेजवर लिहिले आहे.

यापूर्वी रशियाच्या एका बनावट कंपनीने जून 2015 पासून मे 2017 दरम्यान 1,00, 000 डॉलरमध्ये फेसबुकवर ज्या जाहिराती विकत घेतल्या होत्या, त्या 3,000 जाहिरातींच्या प्रती अमेरिकी काँग्रेसला सोपविण्याची फेसबुकने घोषणा केली होती. या जाहिरातींचा संबंध सुमारे 470 खोट्या खात्यांशी जोडण्यात आले होते.

Leave a Comment