पुरेशी तपासणी न झाल्यामुळे निस्सान घेणार 12 लाख कार परत


ग्राहकांना कार देण्यापूर्वी पुरेशी तपासणी न झाल्यामुळे जपानी कंपनी निस्सान 12 लाख कार परत घेण्याची कंपनीने सोमवारी घोषणा केली. ऑक्टोबर 2014 पासून गेल्या महिन्यापर्यंत विकल्या गेलेल्या मोटारी परत मागविण्यात येतील.

परिवहन मंत्रालयाने माहिती देईपर्यंत ही समस्या मला माहीत नव्हती. या निर्णयामुळे कंपनीला 22 कोटी डॉलरचा फटका बसणार आहे, असे निस्सानचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी हिरोतो सैकावा यांनी पत्रकारांना सांगितले.

निस्सानने या समस्येचे सूतोवाच पहिल्यांदा गेल्या शुक्रवारी केले होते. देशातील कंपनीच्या सर्व कारखान्यांमध्ये अपात्र कर्मचाऱ्यांनी या मोटारींच्या चाचण्या केल्या होत्या, असे कंपनीने त्यावेळी म्हटले होते. या समस्येमुळे कंपनीने किमान60,000 वाहनांची विक्री थांबविली आहे. यात नोट, क्यूब आणि लीफ यांसह 21 मॉडेलचा समावेश आहे. आतापर्यंत किती मोटारी विकल्या गेल्या आहेत, याची निश्चिती होणे बाकी असून एकूण मोटारींची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असे सैकावा म्हणाले.

Leave a Comment