दसर्‍याला सोन्यात रंगली खंडोबाची जेजुरी


महाराष्ट्रातील अनेक जाती जमातींचे कुलदैवत असलेले प्रसिद्ध स्थळ खंडोबाची जेजुरी यंदाही दसर्‍यानिमित्त सोन्यात रंगून निघाली. जेजुरीच्या खंडेरायावर दसर्‍यादिवशी पिवळ्या धमक हळदीची उधळण केली जाते व हळदीच्या पिवळ्या रंगात खंडोबाची जेजुरी सोन्याची भासते. तो अनुभव यंदाही अनेक पर्यटक, भाविकांनी घेतला.

दसर्‍याला जेजुरीतील खास कार्यक्रम असतो तो खंडेरायाची ४२ किलोची तलवार एका हातात पेलण्याचा अथवा ती दातात धरून उचलण्याचा. यंदाही ही परंपरा पाळली गेली. जेजुरी हे ठिकाण महाराष्ट्रासाठी खूपच महत्त्वाचे आहे कारण त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. असे सांगतात की शिवाजी महाराज व शहाजी राजे यांची भेट जेजुरी येथे होत असे व तेथे त्यांची राजनितीवर गुप्त चर्चा चालत असे. जेजुरीच्या खंडेरायाची ४२ किलो वजनी तलवार शिवाजी महाराजांनीच दिलेली आहे असाही एक प्रवाद आहे. जगभरात जेजुरी प्रसिद्ध असून येथील दसरा पाहण्यासाठी परदेशी पर्यटकही आवर्जून उपस्थित राहतात.

जेजुरीच्या खंडेरायाच्या देवळाभोवती तटबंदी आहे व छोट्याशा टेकडीवर हे देऊळ आहे. २०० पायर्‍या चढून येथे जावे लागते. देवळातील दीपमाळा अतिशय देखण्या आहेत. येथे चैत्र, मागशिर्ष, पौष व माघ महिन्यात जत्रा भरतात त्यासाठीही भाविक मोठ्या संख्येने येत असतात. मंदिर दोन भागात असून एका मंडप तर दुसर्‍यात गर्भगृह आहे. आत खंडेराया म्हाळसेसह विराजमान आहेत. हेमाडपंथी बांधणीचे हे मंदिर असून २८ फुटी पितळी कासवही आहे.

Leave a Comment