‘हे’ देश सर्वात पर्यटनाच्या दृष्टीने सुरक्षित


दरवर्षी ‘ इंस्टिट्युट ऑफ इकोनॉमिक्स अँड पीस ‘ या संस्थेतर्फे ‘ ग्लोबल पीस इंडेक्स ‘ काढला जातो. या सर्वेक्षणाद्वारे, जगामधील १६३ देश, पर्यटनाच्या दृष्टीने कितपत सुरक्षित आहेत याचा शोध घेतला जातो. या साठी तीन निकष मुख्यत्वे लक्षात घेतले जातात. एखाद्या देशाचे इतर देशांशी असलेले राजकीय संबंध, आंतरराष्ट्रीय पातळीवर इतर देशांशी कोणत्याही कारणांवरून असामंजस्य किंवा वादविवाद, देशाची अंतर्गत परिस्थिती शांततापूर्ण आहे किंवा नाही, ह्या तीन निकषांवरून एखादा देश पर्यटकांसाठी सुरक्षित आहे किंवा नाही, हे ठरविले जाते. ह्याच तीन निकषांवरून, जगामधील पर्यटनाच्या दृष्टीने सर्वात सुरक्षित असणाऱ्या देशांची नावे नुकतीच घोषित केली गेली.

जपान आणि आयर्लंड ह्या देशांनी या यादीमध्ये जागा पटकाविली आहे. आयर्लंड देशामध्ये अंतर्गत किंवा आंतरराष्टीय पातळीवर कोणत्याही प्रकारची राजकीय अस्थिरता नाही, त्यामुळे त्या कारणांवरून इथे हिंसाचार होण्याची शक्यता नाही. जपान मध्ये गुन्हेगारीचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे हे दोन्ही देश पर्यटनासाठी सुरक्षित आहेत. स्वित्झर्लंड हा देश पर्यटकांचा आवडता देश समजला जातो. या देशाला निसर्गाचे मोठे वरदान लाभलेले आहे. या देशामध्येही राजकीय अस्थिरता नाही. या देशाची अंतर्गत परिस्थिती शांततापूर्ण असून, याचे इतर देशांशी कोणतेही राजकीय वादविवाद नाहीत.

कॅनडा ह्या देशामधील नागरिक अतिशय आनंदी स्वभावाचे असून, पर्यटकांना अतिशय आदराने व प्रेमाने वागविणारे समजले जातात. तसेच ह्या देशामध्येही राजकीय अस्थिरता नाही. युरोप मधील स्लोवेनिया ह्या देशामध्ये गुन्हेगारी जवळजवळ नाहीच. या देशामध्ये गुन्हेगारांविरुद्ध कडक कायदे असून, नेहमी सुव्यवस्था राहावी, याची खबरदारी येथील पोलीसयंत्रणा सतत घेत असते. च्झेक रिपब्लिक मध्ये ही गुन्हेगारी किंवा राजकीय अशांती जवळजवळ नाहीच.

डेन्मार्क हा देश जगामधील सर्वात आनंदी लोकांचा देश म्हणून ओळखला जातो. येथील नागरिक अतिशय आनंदी स्वभावाचे असून, आपल्या देशामध्ये आलेल्या पाहुण्यांचे मनापासून स्वागत करणारे आहेत. या देशातील नागरिकांमध्ये नैराश्याचे ( डिप्रेशन ) चे प्रमाण अगदी कमी असून, येथे गुन्हेगारीचे प्रमाणही अतिशय नगण्य आहे. त्याचप्रमाणे पोर्तुगाल, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रिया ह्या देशांमध्ये ही राजकीय पातळीवर सदैव शांतता नांदत असून, ह्या देशांमध्येही गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे. हे सर्वच देश निसर्गाच्या सौंदर्याने नटलेले आहेत.

आईसलंड हा देश पर्यटकांच्या दृष्टीने सर्वात सुरक्षित म्हणून घोषित केला गेला आहे. हा देश राजकीय दृष्ट्या स्थिर असून, येथे गुन्हेगारी अतिशय कमी आहे. मध्यंतरी, गुन्हेगारांच्या अभावी येथील काही तुरुंग कायमस्वरूपी बंद करून टाकण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या देशामध्ये कोणत्याही प्रकारचा दहशतवाद किंवा अशांती नाही. येथील नागरिक ही अतिशय शांतताप्रिय असून, देशाच्या कायद्यांचे काटेकोरपणे पालन करणारे आहेत.

Leave a Comment