पंजाबातील अशुभ संकेत


पंजाबने १९८० च्या दशकात फार मोठा संघर्ष आणि हिंसाचार पाहिलेला आहे. अनुभवलेला आहे. त्यावेळी निर्माण झालेला संघर्ष नेमका काय होता हे एका वाक्यात सांगता येत नाही. पण कॉंग्रेस पक्षातले अंतर्गत मतभेद, त्याला मिळालेली शीख आणि हिंदू यांच्यातल्या द्वेषाची फोडणी, पाण्यावरून हरियाणाशी असलेला वाद, चोरटा व्यापार करणारांचे हितसंबंध, समृद्धीतून आलेला माज आणि दिशाहीन तरुणांची वाढती संख्या अशा अनेक विषयांची सरमिसळ होऊन तिथे गुंतागुंतीचा हिंसाचार सुरू झाला. तो सलग ९ वर्षे सुरू होता. त्यात एक पंतप्रधान, एक शीख नेते, माजी लष्कर प्रमुग आणि ज्येष्ठ पत्रकार यांच्यासह अनेकांच्या हत्या झाल्या. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या हिसाचारात अनेक शीखांच्या जळीत कांडाने समाजमन कायम दुंभगलेले राहिले. पंजाबच्या प्रश्‍नाला कारणीभूत ठरलेले हे सारे घटक इतरही राज्यांत कमी जास्त प्रमाणात मौजुद असतातच पण त्यात जातीय अस्मितेचे विष मिसळले गेले आणि परदेशी शक्तींनी हिंसाचाराला मदत केली की प्रश्‍न गंभीर होतो.

या सगळ्या दारूच्या कोठारावर भावना दुखावणार्‍या एखाद्या घटनेची ठिणगी पडायचाच उशीर. बघता बघता ही आग अशी काही पसरते की, ती आटोक्यात आणणे कठिण होऊन बसते. आता या सगळ्या घटनांची आठवण होण्याचे कारण म्हणजे काही अतिरेकी शक्तींनी पुन्हा एकदा या कोठाराशी खेळ करायला सुरूवात केली असावी असे संकेत मिळायला लागले आहेत. सध्या आपल्या देशात राजकीय स्वार्थासाठी एवढे निरर्थक वाद निर्माण केले जायला लागले आहेत की त्यांच्या गदारोळात अशा महत्त्वाच्या संकेतांकडे दुर्लक्ष होत आहे. पंजाबातल्या १९९० च्या दशकातल्या हिंसाचारात मोठा सहभाग असलेल्या बब्बर खालसा या संघटनेने पुन्हा एकदा तिथे रक्ताची रंगपंचमी खेळण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. लुधियाना पोलिसांनी बब्बर खालसासाठी काम करणार्‍या सात जणांना अटक केली आहे. हे सातजण कॅनडात वास्तव्यास असलेला आणि खलिस्तान निर्मितीसाठी जन्मभर कार्यरत राहण्याची शपथ घेतलेला बब्बर खालसाचा नेता सुरिंदर सिंग बब्बर याच्या प्रेरणेने काम करीत असल्याचे त्यांच्या कबुलीजबाबावरून दिसून आले अाहे. आपण पंजाबातली शांतता नष्ट करण्यासाठी कामाला लागलो होतो असे त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले असून त्यासाठी रचण्यात आलेल्या डावाची माहिती दिली आहे.

सुरिंदरसिंग बब्बर हा आता ब्रिटनमध्ये वास्तव्याला आहे. जगभरात अनेक देशात शीख समाजा विखुरलेला आहे. यातल्या अनेकांना पंजाब हा शीखांचा स्वतंत्र देश व्हावा असे वाटते आणि त्यासाठी चालविल्या जाणार्‍या आंदोलनाला कितीही पैसा द्यायला ते तयार असतात. जगभरात विविध देशांत विखुरलेला शीख समाज चांगलाच धनवान आहे. या समाजाकडून पैसा जमा करण्याचे काम सुरिंदरसिंग बब्बर नेहमीच करीत असतो. तो तिथे राहून पंजाबातल्या अशाच खलिस्तानवादी लोकांना उचकावत असतो. मात्र त्याचे काम मोठ्या योजनाबद्धपणे सुरू असते. तो तिथे बसून काही तरुणोना पैसे देऊन राज्यातल्या जनतेत फूट पडेल अशी कामे करून घेत असतो. सध्या त्याने या सात जणांना हाताशी धरून काही हिंदू नेत्यांच्या हत्यांचा कट रचला होता. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोघा नेत्यांचा समावेश होता. १९८० च्या दशकात त्यांनी असाच कट रचून पंजाबला दशकाच्या हिंसाचाराच्या आगीत लोटले होते पण आता या हत्यासत्रात सोशल मीडियावर लिखाण करणार्‍या काही नेटिझन्सचाही समावेश करण्यात आला आहे. त्यांचे हे नवे लक्ष्य आहे.

सोशल मीडियावर शीख समुदाय आणि खलिस्ताच्या विरोधात लिहिणारांना लक्ष्य करण्याचा बब्बर खालसाचा विचार आहे. काही दिवसांपूर्वी रा. स्व. संघाचे नेते जगदीश गगनेजा यांची गूढ हत्या झाली. शिवाय शिवसेनेचे नेते दुर्गप्रसाद गुप्ता आणि हिंदू तख्ताचे नेते अमित शर्मा यांच्याही हत्या झाल्या. या तिघांच्या या हत्या बब्बर खालसाच्या कटाचाच भाग होत्या का याचा तपास सुरू आहे. तसे दिसून आल्यास बब्बर खालसाने पुन्हा एकदा पंजाब पेटवण्याचे कारस्थान रचले आहे या मताला दुजोरा मिळतो. बब्बर खालसाने कितीही प्रयत्न केले तरीही पंजाबातले नागरिक किंवा परदेशात वास्तव्यास असलेले शीख लोक या बहकाव्याला भुलतील असे काही दिसत नाही कारण त्यांना या सार्‍या हिंसाचारातून कशी बरबादी होते याचा अनुभव आलेला आहे. म्हणूनच बब्बर खालसा ही संघटना नेहमीच अजाण तसेच ज्यांची डोकी भडकवणे सोपे जाते अशा तरुणांनाच हाताशी धरते. नुकत्याच अटक करण्यात आलेल्या सात जणांत पाच जण लहान आहेत. त्यातले चार जण १८ ते २२ वर्षे वयाचे आहेत तर एक जण चक्क सतरा वर्षांचा आहे. पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटना नेहमीच गरीब आणि बेकार तरुणांना हाताशी धरतात तसाच प्रयत्न येथेही सुरू आहे. हे पाच तरुण सातवी आठवीत शाळा सोडलेले बेकार असून ते केवळ पैशांसाठी कोणाचाही खून पाडायला मागे पुढे पहात नाहीत. त्यांना आपण काय करीत आहोत याचे भान आणि ज्ञान नसते पण त्यांना फूस लावणारांना ते माहीत असते. त्यामुळे राज्यातल्या शांततेला चूड लागू शकते.

Leave a Comment