मोहेंजोदडो पुन्हा लुप्त होण्याच्या मार्गावर!

mahonjodaro

प्राचीन सिंधू संस्कृतीचा परिचय करून देणारे मोहेंजोदडो शहर पुन्हा एकदा लुप्त होण्याची भीती आहे. तब्बल पाच हजार वर्षांच्या मानवी इतिहासाची ही साक्ष देखभालीअभावी अत्यंत विपन्नावस्थेत आहे. शहराची निगा राखत असल्याचा दावा पाकिस्तानचे सरकार करते; मात्र, आणखी वीस वर्षे स्थिती अशीच राहिली, तर शहर नष्ट होईल, असे संशोधकांचे मत आहे.

नीटनेटके बांधकाम, गल्ल्या, पाणी व्यवस्थापन असे आधुनिक वाटणारे प्रयोग मोहेंजोदडोमध्ये दिसतात. बाजारासाठी स्वतंत्र व्यवस्था या शहरात होती. जगातील उत्कृष्ट नियोजनबद्ध शहर म्हणून मोहेंजोदडोची ओळख होती. ३५ हजार नागरिक मोहेंजोदडोचे रहिवासी होते. पुरातत्त्व अवशेष म्हणून या शहराला अमूल्य महत्त्व आहे. मात्र, सध्या तेथील अवशेषांची हेळसांड सुरू आहे. घरांचे दरवाजे पडले आहेत. काही घरे कोसळण्याच्या अवस्थेत आहेत.`बीबीसी’च्या वृत्तानुसार, सरकारी पातळीवर होणारे संवर्धनाचे प्रयत्न इतके वाईट आहेत, की त्याने अवशेषांचे नुकसान अधिकच वाढते आहे. चोरांनी मोहेंजोदडो संग्रहालयही सोडलेले नाही. तेथील प्राचीन वस्तू, मोहरा चोरून नेल्या आहेत. पाकिस्तानी पर्यटक मोहेंजोदडो पाहण्यासाठी येतात; तथापि पाकमधील परिस्थितीमुळे परदेशी पर्यटकांचे प्रमाण अतिशय कमी आहे. मोहेंजोदडोमधील एक भाग अद्याप जमिनीखाली आहे. तेवढाच सध्या सुरक्षित असावा, असा अंदाज आहे. खोदकाम झालेला बहुतांश भाग दुरवस्थेमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

मोहेंजोदडोचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घ्यावीच लागेल. परिस्थिती अशीच राहिली, तर डोळ्यांदेखत मोहेंजोदडो नष्ट होऊन जाईल, असे मत पाकिस्तानातील प्रख्यात पुरातत्त्व संशोधक डॉ. आसमॉं इब्राहिम यांनी व्यक्त केले.

Leave a Comment