या गावात बजरंगबलीचे नाव घेण्याचीही बंदी


भारतात सर्वाधिक देवळे, मंदिरे कुणाची असतील तर ती बजरंगबली हनुमानाची. देशातील प्रत्येक गावात किमान एक मारूती मंदिर असतेच. मात्र या नियमालाही अपवाद आहे तो उत्तराखंड राज्याच्या चमोली जिल्ह्यातील द्रोणगिरी या चिमुकल्या गावाचा. या गावात मात्र मारूतीचे देऊळ तर नाहीच पण बजरंगबलीचे नांव उच्चारण्यासही येथील ग्रामस्थांना बंदी आहे. या गावात भुटिया जमातीचे लोक राहतात. कुणी बजरंगबलीचे नाव घेतले अथवा पूजा केली तर त्याला वाळीत टाकले जाते.


यामागची कथा जोडली जाते ती थेट त्रेत्रायुगात घडलेल्या रामायणाशी. राम रावण युद्ध सुरू असताना लक्ष्मणाला रावणपुत्र मेघनादाचा बाण लागून तो मरणासन्न झाला तेव्हा हिमालयातील द्रोणगिरी पर्वतावर उगवणारी संजीवनी बुटीच त्याला वाचवू शकेल असे सांगितले गेले. रामभक्त हनुमानाने लगोलग हवेत झेप घेऊन द्रोणगिरी गाठला पण त्याला संजीवनी बुटी ओळखता येईना तेव्हा त्याने या पर्वताचा एक भाग उचकटून तो श्रीलंकेत नेला. यामुळे आजही या पर्वताचा एक भाग तुटलेला आहे. हनुमानाच्या या कृत्यामुळे द्रोणगिरीचे नुकसान झाले. येथील ग्रामस्थ या पर्वताची पूजा करत असत. त्याच्या श्रद्धेला धक्का लागला व तेव्हापासून येथे हनुमानाची पूजा होत नाही पण त्याचे नावही उच्चारले जात नाही.

या गावात शिवपूजेची प्रथा आहे, रामाचीही पूजा केली जाते मात्र हनुमानाची नाही. आजची तरूण पिढी सांगते, पूर्वापार जे चालत आले ते आम्ही पाळत आलो आहोत. कांही प्रसिद्ध आयुर्वेदाचार्यांच्या मते आजही या पर्वतावर संजीवनी बुटी आहे. काँग्रेस सरकारच्या काळात या बुटीच्या शोधासाठी ५ कोटींचा निधी दिला गेला होता मात्र या बुटीचा शोध अद्यापी लागलेला नाही.

Leave a Comment