दिग्विजयसिंग पायी करणार नर्मदा परिक्रमा


काँग्रेसचे महासचिव दिग्विजयसिंग ३० सप्टेंबरपासून पायी नर्मदा परिक्रमेसाठी जात असून ३३०० किमीची ही परिक्रमा ते सहा महिन्यांत पूर्ण करणार आहेत. या दरम्यान ते रोज २० किमी चालणार आहेत. सिंग यांचे गुरू द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी त्यांना परिक्रमा करण्यास सांगितले होते व त्यांचा आशीर्वाद घेऊनच दिग्विजयसिंग ही परिक्रमा सुरू करणार आहेत.

सिंग यांचे पुत्र आमदार जयवर्धन म्हणाले, वडिलांची ही परिक्रमा धार्मिक व अध्यात्मिक कारणांसाठी असून तिचे राजकारणाशी कांहीही देणेघेणे नाही. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेही वडिलांच्या सोबत परिक्रमेत सहभागी होणार आहेत तसेच त्यांचे काकाही अधुनमधून सिंग यांच्याबरोबर परिक्रमेत असणार आहेत. १९९३ ते २००३ या काळात दिग्विजयसिंग मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या या परिक्रमेत मध्यप्रदेश सरकार त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणार असून एक पोलिस अधिकारी त्यांच्यासोबत असणार आहे.

या परिक्रमेचा राजकारणाशी संबंध नसल्याचे सांगितले जात असले तरी योगायोगाने पुढच्या वर्षातच मध्यप्रदेश व गुजराथमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. दिग्विजय सिंग ज्या मार्गाने परिक्रमा करणार आहेत त्या मार्गावर मध्यप्रदेशातील ११० तर गुजराथमधील २० मतदारसंघ आहेत.

Leave a Comment