मारूती सेलेरिओ कारचा नवा अवतार पुढील महिन्यात होऊ शकतो लॉन्च


नवी दिल्‍ली : या उत्सवाच्या सीझनमध्ये नवीन धमाका करण्यास मारूती सुझुकी सज्ज असून कंपनी त्यांच्या दमदार सेलेरिओ कारचा नवा अवतार क्रॉसओवर पुढील महिन्यात लॉन्च करणार आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नवीन सेलेरिओ ४ ऑक्टोबरला भारतीय बाजारात उतरवणार आहे. सेलेरिओ एक्स असे या कारचे नाव असेल. मारूतीची सर्वाधिक विकल्या जाणा-या कारपैकी सेलेरिओ ही एक आहे. या कारवर कंपनीने अनेक प्रयोग केले आहेत. ही कार कंपनीची पहिली ऑटोमॅटिक हॅचबॅक होती. तसेच कंपनीने ही कार छोट्या डिझल इंजिनसोबत बाजारात आणली होती.

पुढील महिन्यात बाजारात येणारे सेलेरिओ आपल्या सेगमेंटची देशातील पहिली क्रॉसओव्हर हॅचबॅक कार असेल. याआधी टोयोटा इटियॉस क्रॉस, हुंद्यई आय२० अ‍ॅक्टीव्ह आणि फिएट एवेंचुरा क्रॉसओव्हर हॅचबॅक रूपात लॉन्च झाल्या आहेत. असे मानले जात आहे की, या गाड्यांपेक्षा सेलेरिओ क्रॉसची किंमत खूप कमी असेल.