राणे इधर ना उधर


नारायण राणे यांनी कॉंग्रेस तर सोडली आहे पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे भाजपाने त्यांंना प्रवेश दिलेला नाही. कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ते मुक्त झाले असले तरी भाजपाने जवळ न केल्याने आता राणे नेमके काय करीत आहेत हे समजत नाही. मात्र आजवर कॉंग्रेसमध्ये कुजलेले नारायण राणे आता कोठेही नसल्यामुळे कुजण्याची शक्यता दिसायला लागली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कॉंग्रेसच्या श्रेष्ठींनी शरद पवार यांचे जे काही करायचे ठरवले होते तेच आता राणे यांच्या वाट्याला आले आहे. राज्यातला आपल्याला आव्हान देऊ शकणारा नेता मोठा होऊ द्यायचा नाही आणि त्याला सतत खालच्या पातळीवर ठेवायचे असा कॉंग्रेस श्रेष्ठींचा खाक्या असतो. कॉंग्रेस श्रेष्ठींनी कोणाला मोठे होऊ दिले नाही आणि ते स्वत:ही देशाचे राजकारण सांभाळण्याइतके मोठे झाले नाहीत. परिणाम काय झाला आहे हे पहातच आहोत.

पवार निदान सक्षम नेते तरी आहेत. पण, राणे तेवढे सक्षम नाहीत. त्यामुळे त्यांची कोेंडी करणे कॉंग्रेसला सोपे गेले. त्यांच्या भाजपा प्रवेशाने राजकारणात फार मोठी खळबळ माजेल असे काही नाही. त्यांची राज्याच्या एखाद्या भागांत मोठी ताकद आहे असेही काही नाही पण ते जेवढे आहेत त्यापेक्षा मोठे आहेत असे ते स्वत: समजतात. त्यांनी काल कॉंग्रेसचा त्याग केला त्या दिवशी काही भूकंप झाला नाही. आता आपण महाराष्ट्राचा दौरा करू असे त्यांनी जाहीर केले आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांनी आता आपला राज्याचा दौरा सुरू होईल असे अनेकदा जाहीर केले होते पण त्यांनी हा दौरा कधी सुरूच केला नाही कारण त्यांच्या दौर्‍याने राज्यात फार काही घडावे असे त्यांचे सामर्थ्य नाही. आता आता तर शरद पवार यांनीही राज्याचा दौरा करतो असे म्हटले तर राज्याच्या राजकारणात काहीच घडत नाही. मग राणे तर त्या मानाने किती किरकोळ आहेत.

कॉंग्रेस पक्षाने त्यांना पक्षातून न जाण्याचे आवाहन केले पण ते त्यांनी मानले नाही. आपल्याला कॉंग्रेसमध्ये येताना मुख्यमंत्रीपदाचे आश्‍वासन दिले होते असे त्यांचे म्हणणे आहे. ते पुरे केले नाही हा त्यांचा पक्षावर राग आहे पण आता त्याचे काही औचित्य नाही कारण आता काही कॉंग्रेसच्या हातात सत्ता नाही. पण तरीही राणे बाहेर पडले आहेत कारण त्यांची घुसमट होत होती. आता ते बाहेर पडले आहेत पण भाजपाने त्यांना थारा दिलेला नाही. त्यामुळे तर त्यांची अवस्था त्रिशंकू सारखी झाली आहे.

Leave a Comment