या मंदिरातून दसर्‍याला रामाची नाही तर रावणाची होते पूजा


विजयादशमी म्हणजे दसरा. नवरात्रीचा शेवटचा दिवस. भीषण युद्ध करून महिषासुराला ठार करणारी दुर्गा दसर्‍यादिवशीच शांत होते. तसेच प्रभू रामाने याच दिवशी रावणाचा वध केला असे मानले जाते. दसर्‍यादिवशी अनेक भागात रावणदहन केले जाते. सुष्टांचा दुष्टांवर विजय या अर्थानेही दसरा साजरा केला जातो. साडेतीन शुभ मुहूर्तातील एक दसरा आहे. देशभरात या दिवशी अनेक ठिकाणी रावणाचा पुतळा जाळला जात असला तरी भारतात कांही ठिकाणी या दिवशी रावणदहन केले जात नाही तर रावणाची पूजा केली जाते. देशभरात अशी रावणाची पाच मंदिरे आहेत तेथे दसर्‍यादिवशी विशेष पूजा अर्चा होते.

कानपूर येथील शिवाला मंदिर वर्षातून फक्त एकाच दिवशी म्हणजे दसर्‍याला उघडले जाते.येथे असलेल्या प्राचीन कैलास मंदिराजवळ हे रावणाचे मंदिर आहे. शहरात अन्यत्र या दिवशी रामाची पूजा केली जात असते मात्र या मंदिरात रावणाची पूजा केली जाते.


मध्यप्रदेशातील विदिशा मधील रावणग्राम दसर्‍याच्या पूजेसाठी विशेष प्रसिद्धआहे. येथील रावण मंदिरात रावणाची १० फुटी मूर्ती असून येथे दसरा साजरा केला जात नाही तर त्या दिवशी रावणाची पूजा केली जाते.


हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील बैजनास्य बिनवा पूल येथे रावण मंदिर आहे. या मंदिरात शिवलिंगाच्या जवळ प्रचंड मोठे पाऊल खोदलेले आहे. येथेच रावणाने एका पायावर उभे राहून शिवाची तपश्चर्या केली होती. येथील खोदकामात एक यज्ञकुंडही सापडले आहे. तेथेच रावणाने शिवाला आपल्या नऊ मस्तकांची आहुती दिली होती अशी भावना आहे. येथेच रावणाने शिवाकडून मोक्षाचे वरदान मिळविले होते. येथे रावणाचा पुतळा जाळला तर हमखास मृत्यू येतो असा समज असल्याने रावणदहन केले जात नाही.


आंध्रप्रदेशातील काविनाड येथे रावणाने शिवलिंगाची स्थापना केली होती असे सांगितले जाते. येथेच शिवलिंगाजवळ रावणाची मूर्ती आहे. येथे शिवलिंग व रावण मूर्तीची पूजा करण्याचा मान मच्छीमारांकडे आहे. रावण लंकेचा राजा होता. श्रीलंकेत असा समज आहे कीराजा वलगम्बा याने रावणाच्या नावाने गुहेत मंदिर बांधले होते.


बिसरख या उत्तर प्रदेशातील नॉयडा जिल्ह्यातील गांवात रावणाचे प्रचंड मंदिर बांधले जात आहे. असे सांगतात की हे रावणाचे पैतृक गांव. येथील शासकीय गॅजेटमध्येही तसा उल्लेख आढळतो. विश्वेसरा असे या गावाचे नांव रावणाचे वडील विश्रवा यांच्यावरूनच पडल्याचेही सांगितले जाते. त्याचा अपभ्रंश आता बिसरख असा केला जातो.

Leave a Comment