आजकाल एक्सरे करूनही माणसाच्या शरीरातील दुखण्याची कल्पना येत नसेल तर सीटीस्कॅन केले जातात. माणसांचे सीटीस्कॅन करणे फार नवलाचे राहिलेले नाही तसेच प्राणीजगतातही प्राण्यांच्या सर्जरी, त्यांचे एक्सरे असे प्रकार नवलाचे राहिलेले नाहीत. भुवनेश्वरमध्ये नुकताच एका आठ फुटी अजगराचे सीटीस्कॅन करण्यात आले व देशात या प्रकारने कोणत्याही प्राण्याची तपासणी बहुदा प्रथमच केली गेली.
अजगराचेही सीटीस्कॅन
मिळालेल्या माहितीनुसार भुवनेश्वरपासून जवळ असलेल्या आनंदपूर येथे वनविभागाच्या कर्मचार्यांना एक भलामोठा अजगर डोक्याला जखम झालेल्या अवस्थेत सापडला. त्याला गंभीर अवस्थेत स्नेक हेल्पलाईन कडे सोपविले गेले. युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रीकल्चर अॅन्ड टेक्नॉलॉजी मध्ये त्याचा शुक्रवारी एक्सरे केला गेला मात्र तरीही त्याच्या डोक्याच्या जखमेचा अंदाज न आल्याने खासगी रूग्णालयात त्याचे सीटीस्कॅन केले गेले. आता हा अजगर स्नेक हेल्प संस्थेच्या देखरेखीखाली आहे.
या संस्थेचे शुभेंदु मलीक या संदर्भात माहिती देताना म्हणाले, सीटीस्कॅनमध्ये अजगराच्या डोक्याच्या आतील बाजूस जखम झाली असल्याचे दिसून आले असून वैद्यकीय तज्ञांकडून त्याच्यावर उपचार केले जात आहेत.