यशवंत सिन्हांनी आर्थिक परिस्थितीवर व्यक्त केली चिंता


नवी दिल्ली – भाजप नेते आणि अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात मंत्री असलेल्या यशवंत सिन्हा यांनी नरेंद्र मोदी सरकारवर देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर (जीडीपी) सातत्याने घसरत आहे. त्यामुळे आर्थिक मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जीडीपीच्या घसरणीत नोटाबंदीचा घेतलेला निर्णय हा आगीत तेल ओतण्यासारखाच आहे, असा हल्लाबोल केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरही यावेळी त्यांनी निशाणा साधला.

सिन्हा यांनी सध्याच्या आर्थिक मंदीसदृश्य परिस्थितीवरही ‘इंडियन एक्स्प्रेस’मधील लेखातून चिंता व्यक्त केली. अर्थव्यवस्थेला ‘चौपट’ करण्याचे काम आपल्या अर्थमंत्र्यांनी केले असून मी यावर गप्प बसलो तर राष्ट्रीय कर्तव्य निभावण्यात मी अपयशी ठरेल. त्यामुळे आता मला बोलावेच लागेल, असे म्हणत त्यांनी जेटलींवरच थेट तोफ डागली.

माझ्या बोलण्याने पक्षाविरोधात बोलण्याचे धाडस करत नाहीत, असे लोक दुखावले जातील, मला हे ठाऊक असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. या सरकारमधील सक्षम मंत्री म्हणून अरुण जेटली यांना मानले जाते. अरुण जेटलींनाच २०१४ मध्ये भाजप सरकारमध्ये अर्थमंत्रिपद दिले जाईल, असे बोलले जात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची पात्रता पाहता त्यांच्याकडे अर्थ मंत्रालय, संरक्षण आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाची जबाबदारी सोपवली होती, असेही ते म्हणाले. मलाही अर्थ मंत्रालयाचे काम किती कठिण आणि किचकट आहे याची जाणीव आहे. २४ तास काम करावे लागते. हे काम सुपरमॅन अरुण जेटलींनाही कठिण वाटले असेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

Leave a Comment